बेपत्ता बालकाच्या शोधासाठी नाकाबंदी

By Admin | Updated: May 22, 2014 00:19 IST2014-05-22T00:18:05+5:302014-05-22T00:19:27+5:30

चांदोली अभयारण्य : रात्री उशिरापर्यंत जंगलात दोनवर्षीय आर्यनचा शोध

Blockade Search for missing child | बेपत्ता बालकाच्या शोधासाठी नाकाबंदी

बेपत्ता बालकाच्या शोधासाठी नाकाबंदी

ढेबेवाडी : चांदोली अभयारण्याच्या गर्द झाडीत वसलेल्या वरचे घोटील (ता. पाटण) या गावातील आर्यन जयवंत पवार हा दोन वर्षांचा बालक संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला आहे. आर्यन आज, बुधवारी सकाळी चुलत्यांपाठोपाठ जंगलाच्या दिशेने काही अंतरापर्यंत गेला होता. चुलत्यांनी त्याला तेथून परत घरी जाण्यास सांगितले होते. मात्र, तो घरी परतला नाही. ढेबेवाडीपासून पश्चिमेला सुमारे २५ किलोमीटरअंतरावर वाल्मीक पठारावर वरचे घोटील हे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या चारही बाजूस चांदोली अभयारण्याचे घनदाट जंगल आहे. परिसरात जंगली श्वापदांचाही मोठा वावर आहे. यापूर्वी अनेकवेळा श्वापदांनी येथील ग्रामस्थांवर हल्ले केले आहेत. गावापासून थोड्या अंतरावर घनदाट जंगलानजीक पवार कुटुंबीयांचे घर आहे. या घरात जयवंत पवार हे पत्नी सविता, मुलगी सोनल व मुलगा आर्यन यांच्यासमवेत वास्तव्यास आहेत. वास्तविक, हे कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्यास असते. मात्र, सध्या उन्हाळ्याची सुटी असल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी जयवंत हे पत्नी व मुलांसमवेत गावी वरचे घोटील येथे आले आहेत. दरम्यान, सोमवारी काही कामानिमित्त जयवंत हे मुंबईला गेले. त्यामुळे घरी पत्नी, मुलगी व मुलगा असे तिघेच होते. आर्यनचे चुलते आज सकाळी जंगलाच्या दिशेने जनावरांना चारा आणण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आर्यन त्यांच्या पाठीमागे निघाला. आर्यन आपल्या पाठोपाठ येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चुलत्यांनी त्याला हटकले. त्याला घरी जाण्यास सांगून चुलते पुढे निघून गेले. त्यानंतर आर्यन उशिरापर्यंत घरी परतला नाही. बराचवेळ आर्यन दृष्टीस न पडल्याने आई सविता यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. नातेवाईक व ग्रामस्थांनी याबाबतची माहिती ढेबेवाडी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तसेच सुमारे ४० तरुणांनी जंगल पिंजून काढले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. (प्रतिनिधी) चार जिल्ह्यांत नाकाबंदी आर्यन बेपत्ता झाल्यानंतर सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी ढेबेवाडी विभागातून बाहेर पडणार्‍या सर्व रस्त्यांसह सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांत नाकाबंदी केली. वाहनांची यावेळी तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जंगलात शोधमोहीम सुरू होती.

Web Title: Blockade Search for missing child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.