विदेशातील काळा पैसा - अवघे ३,७७० कोटी पडले सरकारच्या पदरात
By Admin | Updated: October 1, 2015 14:45 IST2015-10-01T14:45:11+5:302015-10-01T14:45:11+5:30
विदेशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने करचुकव्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता, त्याला प्रतिसाद देत ६३८ जणांनी विदेशामध्ये ३,७७० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.

विदेशातील काळा पैसा - अवघे ३,७७० कोटी पडले सरकारच्या पदरात
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ०१ - विदेशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने करचुकव्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता, त्याला प्रतिसाद देत ६३८ जणांनी विदेशामध्ये ३,७७० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी ६,५०० कोटी रुपये परत येतील असा अंदाज व्यक्त केल्याचा दाखल देत विरोधकांनी टीका केली आहे. त्यातही एक लाख कोटी रुपये विदेशात दडवले असून प्रत्येक भारतीयाला १५ लाख रुपये मिळतिल या भाजपाच्या निवडणूकपूर्व आश्वासनाचीही खिल्ली उडवण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुर्जेवाला यांनी तर काळ्या पैशाप्रकरणी जनतेची फसवणूक केल्यामुळे पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी असे आवाहन केले आहे.
एप्रिलमध्ये विदेशातील गुंतवणुकीसंदर्भात तसेच काळ्या पैशाच्या संदर्भात कडक कायदे करण्यात आले, ज्यामध्ये १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा समावेश आहे.
ज्यांनी विदेशातील बेहिशेबी संपत्ती जाहीर केलेली नाही, त्यांनी सप्टेंबरच्या ३० तारखेपर्यंत जाहीर केल्यास त्यांच्यावर नवीन कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही असे जाहीर करण्यात आले होते. अर्थात, ३० टक्के दराने कर व ३० टक्के एवढा दंड या करचुकव्यांना ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत भरावयाचा असल्यामुळेही अनेकांनी बेहिशेबी मालमत्ता जाहीर केली नसावी असे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे, स्वेच्छेने विदेशातील बेहिशेबी संपत्ती करबुडवे जाहीर करतिल आणि हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा परत येईल ही सरकारची अपेक्षा फोल ठरली असून अवघे ३,७७० कोटी रुपये पदरात पडल्याचे दिसत आहे.