हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक जवळ येत असताना, भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी रात्री अनौपचारिक चर्चा केली; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.
एनडीएच्या मित्रपक्षांशी अनौपचारिक संपर्क सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी सत्ताधारी आघाडीच्या खासदारांना संबोधित करू शकतात; कारण संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. नामांकनाची मुदत २१ ऑगस्टपर्यंत आहे.
या नावांची आहे चर्चा
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नावाची चर्चा आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याचे सांगितले जाते.
मतदान ९ सप्टेंबर रोजी होईल. एनडीए १९-२० ऑगस्टपर्यंत आपल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करील, अशी अपेक्षा आहे. नामांकन अर्ज दाखल करताना मित्रपक्षांना प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून घेऊन आघाडीची एकता दाखविली जाईल. एनडीएच्या बैठकीत एनडीएतील सर्व केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील.