भाजपातील सत्तासंघर्ष उघड्यावर
By Admin | Updated: August 28, 2014 02:23 IST2014-08-28T02:23:46+5:302014-08-28T02:23:46+5:30
राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या कथित गैरवर्तनाच्या बातम्या आणि कथितरीत्या या बातम्या पसरविणाऱ्या आपल्याच वरिष्ठ सहकाऱ्याविरुद्ध राजनाथसिंह यांनी पक्षाध्यक्षांकडे केलेली तक्रार

भाजपातील सत्तासंघर्ष उघड्यावर
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या कथित गैरवर्तनाच्या बातम्या आणि कथितरीत्या या बातम्या पसरविणाऱ्या आपल्याच वरिष्ठ सहकाऱ्याविरुद्ध राजनाथसिंह यांनी पक्षाध्यक्षांकडे केलेली तक्रार या कुरघोडीवरून सत्ताधारी भाजपातील सत्तासंघर्ष उघड झाला आहे़ या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांत बातम्या येऊन गेल्याच्या महिनाभरानंतर राजनाथसिंह यांनी हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दरबारात न्यावे, यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत़
या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधल्यावर पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी मीडियातील वृत्ताबाबत आश्चर्य व्यक्त केले, असे राजनाथसिंह यांनी बुधवारी सांगितले़ आपल्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांसोबत बोलताना राजनाथसिंह यांनी त्यांच्या व मुलाबाबतच्या बातम्या निराधार ठरवल्या़ यानंतर काहीच मिनिटांत पंतप्रधान कार्यालयाने याबाबत खुलासा केला़ गृहमंत्र्यांच्या मुलाबाबतचे वृत्त आणि यात पंतप्रधानांचा उल्लेख निराधार असून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले़ पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही एक पत्रक प्रसिद्धीस देऊन राजनाथसिंह आणि त्यांच्या मुलाच्या पक्षकार्यातील योगदानाची प्रशंसा केली़ राजनाथसिंहांचे पुत्र पंकज हे उत्तर प्रदेशात भाजपाचे सरचिटणीस आहेत आणि गेल्या १० वर्षांत एक निष्ठावान कार्यकर्त्याच्या रूपात विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, असे शहांनी म्हटले आहे़ आमच्या सर्व मंत्र्यांचे आचरण उच्चकोटीचे असून त्यांच्या निष्ठेबाबत कुठलाही संशय नाही़ प्रसार माध्यमांनी भ्रामक आणि निराधार वृत्त प्रसारित करणे थांबवावे, असेही त्यांनी म्हटले आहे़ येत्या १३ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील नोएडात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अमित शहा यांनी राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याला तिकीट नाकारले आहे़ यामुळे राजनाथसिंह कुठेतरी दुखावले होते़ पंकज याला तिकीट नाकारून भाजपाने नोएडातून ६२ वर्षांच्या उद्योजिका विमला बाथम यांना उमेदवारी जाहीर केली़ राजनाथसिंहांना हे दुखावणारे होते़ अर्थात राजनाथसिंह यांनी पंकजच्या कथित गैरवर्तनाच्या प्रकरणात त्याला तिकीट नाकारण्याचा मुद्दा येऊ दिला नाही़ तो त्यांनी अतिशय सावधगिरीने टाळला़ राजनाथसिंह वादात अडकणारे नितीन गडकरी यांच्यानंतरचे दुसरे ज्येष्ठ मंत्री आहेत़ गडकरींच्या निवासस्थानी हेरगिरी करणारी उपकरणे सापडल्याचे वृत्त येताच ते वादात सापडले होते़ पुढे हे प्रकरण निस्तरायला त्यांना व पक्षाला अनेक प्रयत्न करावे लागले होते़ येनकेनप्रकारेण सरकारला १०० दिवस पूर्ण होण्याच्या आनंदावर विरजण पडू नये, असे रालोआ सरकारचे प्रयत्न आहेत़