मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजपा खासदार
By Admin | Updated: November 10, 2015 12:45 IST2015-11-10T12:45:15+5:302015-11-10T12:45:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजपा खासदार भोला सिंह यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे.

मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजपा खासदार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजपा खासदार भोला सिंह यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. बिहारमध्ये मैदानात सेनापती होते पण सैन्यच नव्हते असा उहापोह त्यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यावर पक्षनेतृत्व व नरेंद्र मोदींविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे. भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा, आर के सिंह, हुकुमनारायण यादव यांच्यापाठोपाठ खासदार भोला सिंह यांनीदेखील पक्ष नेतृत्वावर टीका करत पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत. ७६ वर्षीय भोला सिंह हे बेगूसराय येथील खासदार आहेत. बिहार निवडणुकीतील पराभवाविषयी सिंह यांनी एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीवर परखड मतं मांडली. नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाचे भान ठेऊन भाषण केले पाहिजे होते. मोदी लालूप्रसाद यांच्या गुगलीत फसले असेही त्यांनी नमूद केले. भाजपा नेते व गिरीरीज सिंह यांची वादग्रस्त विधानंही भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली असा दावाही त्यांनी केला.
गिरीराज सिंह यांनी पाकिस्तान व गोमांस हे मुद्दे बिहारच्या प्रचारात आणले. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही भोला सिंह यांनी केली आहे. बिहारमध्ये सेनापती हेलिकॉप्टरमध्ये उडत होते, पण सैन्य नव्हते, शस्त्रास्त्रही नव्हते, प्रत्येकाला बिहारचे मुख्यमंत्रीपद हवे होते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.