विदर्भात भाजपाचा झंझावात
By Admin | Updated: October 20, 2014 05:06 IST2014-10-20T05:06:19+5:302014-10-20T05:06:19+5:30
२००९च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात तब्बल २५ जागांची भर पडून ४४ जागांसह हा पक्ष क्रमांक १वर आला आहे.

विदर्भात भाजपाचा झंझावात
दिलीप तिखिले
लोकसभा निवडणुकीतील मोदी प्रभाव आणि अॅन्टिइंकम्बसीचा फायदा उचलत विदर्भात भाजपाने जोरदार मुसंडी मारली. २००९च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात तब्बल २५ जागांची भर पडून ४४ जागांसह हा पक्ष क्रमांक १वर आला आहे.
आघाडी आणि युती तुटल्यानंतर विदर्भात बहुतांश ठिकाणी चौरंगी लढती होत्या. संबंध तुटल्याचा सर्वाधिक फायदा भाजपालाच झाला. राष्ट्रवादी-काँग्रेस आपसांतच भिडल्यामुळे दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान झाले. शिवसेनेचा तसाही विदर्भात जोर नव्हता, त्यामुळे भाजपाला लढत कठीण गेली नाही. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यात अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे.
तिकडे वऱ्हाड प्रांतातही भाजपाने या वेळी मुसंडी मारली आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील १५पैकी ९ जागांवर भगवा फडकला आहे. काँग्रेसच्या वाट्याला केवळ ३ तर सेनेला २ जागा मिळाल्या. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकमेव सभा होऊनही भाजपाला लक्षणीय यश मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेतलेल्या बुलडाण्यात काँग्रेसला यश लाभले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांत सभा घेऊनही त्यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही.
या वेळी लोकांनी नकाराधिकाराचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. गडचिरोलीत तर ‘नोटा’ला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. विदर्भातील चार जिल्ह्यांतून काँग्रेस हद्दपार झाली.
आणखी एक उल्लेखनीय बाब. याला योगायोग म्हणा किंवा आणखी काही़ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदर्भातील ब्रह्मपुरी, गोंदिया, चांदूर रेल्वे (धामणगाव रेल्वे) येथे जाहीर सभा घेतल्या पण या तिन्ही ठिकाणी भाजपा उमेदवार पराभूत झाले. सोनिया गांधी ब्रह्मपुरी, गोंदियाला जाऊन आल्या तेथील काँग्रेस उमेदवार विजयी झाले.