भाजपाचे सरकार हे गरिबांचेच - मोदी
By Admin | Updated: May 20, 2014 13:25 IST2014-05-20T13:25:31+5:302014-05-20T13:25:31+5:30
केंद्रात सत्तेवर येणारे भाजपचे सरकार हे देशातील गरिबांसाठी काम करणारे असेल अशी ग्वाही भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

भाजपाचे सरकार हे गरिबांचेच - मोदी
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २० - केंद्रात सत्तेवर येणारे भाजपचे सरकार हे देशातील गरिबांसाठी काम करणारे असेल अशी ग्वाही भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधानपदावर विराजमान होताच त्यापुढील प्रत्येक क्षण हा देशाच्या जनतेसाठी कार्य करु असे मोदींनी म्हटले आहे.
मंगळवारी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लालकृष्ण आडवाणींनी संसदीय समितीच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुरलीमनोहर जोशी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी व अन्य वरिष्ठ नेत्यांनी समर्थन दिल्यावर पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींची संसदीय नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर मोदींनी भाषण केले. 'देशाच्या मतदारांनी आशा आणि विश्वासापोटीच मतदान केल्याचे निकालावरुन स्पष्ट होते. आशावाद माझ्या डीएनएत असून आशावादी व्यक्तीच देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकते' असे मोदींनी सांगितले. जनतेने दिलेले दायित्व पूर्ण करणार असून २०१९ मध्ये मी माझ्या कामाचा रिपोर्टकार्ड जनतेसमोर सादर करीन असे मोदींनी आवर्जून सांगितले.