जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे पहिले सरकार नजरेत

By Admin | Updated: December 24, 2014 02:08 IST2014-12-24T02:08:02+5:302014-12-24T02:08:02+5:30

भारतीय जनता पार्टीची कामगिरी झारखंडमध्ये स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करता येईल एवढी चांगली झाली आहे

BJP's first government in Jammu and Kashmir eyes | जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे पहिले सरकार नजरेत

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे पहिले सरकार नजरेत

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीची कामगिरी झारखंडमध्ये स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करता येईल एवढी चांगली झाली आहे; परंतु जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र तिचे ‘मिशन ४४’ यशस्वी न होता ८७ जागांच्या विधानसभेत अवघ्या २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तरीही या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या जागा दुपटीपेक्षा जास्त झाल्या.
भाजपाला मिळालेल्या २५ जागा या हिंदूबहुल जम्मूतील आहेत. आता त्याला एक तर भ्रष्ट नॅशनल कॉन्फरन्स (जागा १५ अधिक २ अपक्ष) आणि सज्जाद लोण (जागा अवघ्या २) यांच्याशी हातमिळवणी करावी लागेल किंवा २८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या मुफ्ती मोहंमद सईद यांच्या पीडीपीशी. पीडीपीच्या जागा या काश्मीर खोऱ्यातील मुस्लिमबहुल भागातील आहेत.
भाजपासाठी आनंदाची बाब अशी की, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती असो वा मिर्झा अफजल बेग असो, या नेतृत्वाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबर राहायला आमचे प्राधान्य असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपाचे नेते राम माधव दिवसभर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर हे निकाल आमच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत असे सांगत होते; परंतु ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सबरोबर हातमिळवणी करण्याऐवजी पीडीपीबरोबर काम करायला प्राधान्य देईल, असे राम माधव म्हणत होते. दुसरीकडे ओमर अब्दुल्ला यांनीदेखील अनेक मुलाखती देऊन भाजपाशी हातमिळवणी करायला आम्हालाही आवडेल (पण आमच्याशी संपर्क साधला तर) असे संकेत दिले होते.
काँग्रेसचे १२ आमदार असून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांचा काही उपयोग नाही त्यामुळे मुफ्ती यांना मोदी किंवा शहा यांना फोन करून सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे सांगावे लागेल हे उघड आहे.

Web Title: BJP's first government in Jammu and Kashmir eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.