पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता दौऱ्यावर आहेत. ब्रिगेड ग्राउंडवर पंतप्रधानांची मोठी सभा होणार आहे, मात्र या सभेपूर्वीच मैदानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.
कार्यकर्त्यांनी पोलिसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी बॅगा घेऊन आत जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर बसून धरणं आंदोलन सुरू केले.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे बंगालमधील जनतेमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. लोक बोटी, बस आणि इतर वाहनांनी मोठ्या संख्येने ब्रिगेड ग्राउंडकडे रवाना होत आहेत. सभेत सहभागी होण्यासाठी जाणारे लोक 'मोदीजी-मोदीजी'च्या घोषणा देत आहेत. भाजपाच्या दृष्टीने पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
काय म्हणाले भाजपा नेते?
पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत भाजपा नेते दिलीप घोष म्हणाले की, "प्रत्येक मोठ्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान दौरा करतात. भाजपा नेहमीच मोठ्या सभांचं आयोजन करते. बंगालच्या जनतेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत." त्यांनी पुढे असंही नमूद केलं की, संपूर्ण देशातील जनता पंतप्रधानांच्या शब्दावर विश्वास ठेवत आहे. "बंगालमधील लोकांना भडकवलं जात आहे, घाबरवलं जात आहे. नक्की कमतरता कुठे आहे? कोणाला गॅस मिळाला नाही? जाणीवपूर्वक समस्या निर्माण केल्या जात आहेत," असा आरोपही त्यांनी केला.
कोट्यवधींच्या विकासकामांची भेट
कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवरून पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालला मोठी भेट देणार आहेत. ते सुमारे १८,६८० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या योजनांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर आणि नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे केवळ प्रादेशिक विकासाला चालना मिळणार नाही, तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थाही मजबूत होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.