नवी दिल्ली - संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महेंद्रसिंग धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करत १५ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिले आहे. धोनीनेच ट्विटरवरुन हे पत्र शेअर केले आहे. मोदींनी लिहिलेल्या पत्रात धोनीच्या पार्श्वभूमीपासून ते उत्तुंग यशापर्यंतच्या प्रवासाचे कौतुक केले. क्रिकेटर, सैनिक आणि एक चांगला माणूस असे म्हणत मोदींनी धोनीचे कौतुक केले आहे. तर, दुसरीकडे भाजपाकडून धोनी आणि साक्षीला भाजपात सामिल करुन घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकांवेळीही धोनीला भाजपाकडून प्रचारासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. मात्र, धोनीने त्यावेळी कुठल्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. पण, धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर धोनीचे उद्योग पार्टनर अरुण पांडे यांनी धोनी आगामी काळात प्रादेशिक कामात राहतील, असे सांगितले होते. त्यामुळे, माही व त्याची पत्नी साक्षी यांना भाजपात घेण्यासाठी भाजपा नेते प्रयत्नशील असल्याचे समजते. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी साक्षी धोनीला रांची येथून लोकसभेचं तिकीट देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे वृत्त पंजाब केसरीने दिले आहे.
धोनी व साक्षीचा भाजपा प्रवेश हा केवळ चर्चेचा विषय आहे, याबाबत सध्यातरी कुठलिही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, यापूर्वीही अनेक क्रिकेटर्स भाजपात सहभागी झाले आहेत. गौतम गंभीरने लोकसभा निवडणुकांपूर्वीच भाजपात प्रवेश करुन खासदार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. तर, नवज्योतसिंग सिद्धू यांनी यांनीही भाजपात प्रवेश केला होता, सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत. यांसह, दिवंगत चेतन चौहान, ऑलंपिक विजेता राजवर्धन राठोड, योगेश्वर दत्त, कॉमनवेल्थ गेम्स विजेता बबिता फोगाट, सायना नेहवाल या खेळाडूंनीही भाजपात प्रवेश केला आहे.
पंतप्रधान मोदींकडून धोनीचे कौतुक
‘धोनी तुझ्यात नव्या भारताचा आत्मा दिसतो. 'न्यू इंडिया' मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबीयांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हिडीओ बरेच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावे, हेदेखील समजते.’अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे.
धोनीने मानले आभार...
‘कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असे त्यांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद,’ असे म्हणत धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र टिष्ट्वट केले आणि त्यांचे आभारही मानले.