दिल्लीतही रंगणार भाजपा विरुद्ध शिवसेना सामना
By Admin | Updated: December 26, 2014 20:53 IST2014-12-26T20:48:59+5:302014-12-26T20:53:34+5:30
दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा व त्यांची टीम सज्ज होत असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनही दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.

दिल्लीतही रंगणार भाजपा विरुद्ध शिवसेना सामना
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा व त्यांची टीम सज्ज होत असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनही दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. शुक्रवारी शिवसेनेने दिल्लीतील १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून लवकरच दुसरी यादीही जाहीर करु असे शिवसनेनेच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. सत्तास्थापनेनंतर शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. दिल्लीतही पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून दिल्लीच्या गादीवर विराजमान होण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपासमोर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांचे प्रमुख आव्हान आहे. मात्र यामध्ये आता शिवसेनेनेही उडी घेतल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेनेने यापूर्वीही दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत. २००८ आणि २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊ उमेदवार उतरवले होते. मात्र यंदा शिवसेनेने जास्तीत जास्त उमेदवार उतरवण्याची रणनिती आखल्याचे दिसते. शुक्रवारी शिवसेनेचे दिल्लीतील नेते शिवदत्त शर्मा यांनी १० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. लवकरच दुसरी यादीही जाहीर करु असे शर्मा यांनी म्हटले असून उमेदवारांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीत प्रचारसभा घेतील अशी घोषणाही त्यांनी केली.
हिंदूत्ववाद आणि दिल्लीतील पायाभूत सुविधांचे प्रश्न हेच आमच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील असे शर्मा यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपाला मिळणा-या हिंदूत्ववादी मतांवर शिवसेनेचा डोळा हे उघडच आहे. याचा फटका भाजपाला बसतो की शिवसेनेची ही खेळी अपयशी ठरते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.