विरोधी मते भाजपाला मिळणार?
By Admin | Updated: July 3, 2017 01:03 IST2017-07-03T01:03:08+5:302017-07-03T01:03:08+5:30
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांना आमच्या विरोधकांचीही

विरोधी मते भाजपाला मिळणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांना आमच्या विरोधकांचीही (विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार) मते मिळतील, अशी आशा भाजपला आहे.
समाजवादी पक्षातील अंतर्गत भांडणांमुळे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव व त्यांचे बंधू शिवपाल यादव यांच्याशी निष्ठावंत असलेले काही आमदार कोविंद हे भूमिपूत्र (उत्तर प्रदेशचे) असल्यामुळे त्यांना मते देऊ शकतील, असे सूत्रांनी सांगितले. कोविंद यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. शिवपाल यादव यांनी नुकतीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर यादव यांच्या पुढच्या खेळीबद्दल चर्चा सुरू झाली. कोविंद यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या सूत्रांनी सांगितले की समाजवादी पक्षाचे काही आमदार कोविंद यांना मत देण्याची अपेक्षा आहे.
बिहारमध्ये विरोधी पक्ष खूपच चांगल्या स्थितीत आहे. परंतु मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्यावर त्यांच्या आमदारांत मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपच्या नेत्याने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलातून आम्हाला मते मिळू शकतात, असे म्हटले. मीरा कुमार यांना जास्तीतजास्त मते मिळावीत यासाठी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे आटोकाट प्रयत्न करीत आहेत परंतु काँग्रेसच्या तटबंदीला तडे जाऊ शकतात, असे हा नेता म्हणाला. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी पक्षाने आदेश देण्याची काहीही तरतूद नाही. आमदार आणि खासदार हे आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला मते देण्यास स्वतंत्र आहेत आणि कोणाची पसंती काय असेल हे शोधून काढणे शक्य नाही. मतदान १७ जुलै रोजी व मतमोजणी २० जुलै रोजी होणार आहे.
मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाचेही भवितव्य अनिश्चित आहे. त्याचे काही आमदारदेखील मायावती यांचा मीरा कुमार यांना पाठिंबा असला तरी कोविंद यांना मते देऊ शकतात.
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे ४०३ सदस्यांच्या विधानसभेत अनुक्रमे ५४ आणि १९ आमदार आहेत. सपचे पाच लोकसभा आणि १८ राज्यसभा सदस्य आहेत.
मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाचेही भवितव्य अनिश्चित आहे. त्याचे काही आमदारदेखील मायावती यांचा मीरा कुमार यांना पाठिंबा असला तरी कोविंद यांना मते देऊ शकतात. बसपचे राज्यसभेत सहा सदस्य आहेत. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असल्यामुळे काही विरोधी सदस्य कोविंद यांना मत देऊ शकतात.