भाजपा शिवसेनेबाबत आक्रमक होणार
By Admin | Updated: March 20, 2015 01:20 IST2015-03-20T01:20:13+5:302015-03-20T01:20:13+5:30
महाराष्ट्रात सरकारात असलेली शिवसेना सातत्याने सरकारवर टीका करत असल्याने शिवसेनेबाबतही आक्रमक भूमिका घेण्याची तयारी भाजपाने केली आहे.
भाजपा शिवसेनेबाबत आक्रमक होणार
राज्यभर सर्वपक्षीय ‘इनकमिंग’ : वांद्रे, तासगावच्या रिंगणातून भाजपा बाहेर, दोन आठवड्यांत प्रदेश कार्यकारिणी, प्रदेशात मोठे बदल
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रात सरकारात असलेली शिवसेना सातत्याने सरकारवर टीका करत असल्याने शिवसेनेबाबतही आक्रमक भूमिका घेण्याची तयारी भाजपाने केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रदेश कार्यकारिणीनंतर शिवसेनेबाबत जशास तसे धोरण राबविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. भाजपाची प्रदेश कार्यकारिणी दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश शहा यांनी दानवे यांना दिले आहेत. त्यात तरुणांना अधिक वाव देण्याचे संकेत असून, मोठ्या फेरबदलाचे संकेत आहेत.
शिवसेना विरोधकांची भूमिका वठवित असल्याने जनमानसात सरकारची प्रतिमा ठसत नसल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेबाबत नरमाईने वागू नये, असेच बजावण्यात आले आहे.
प्रथम सूचक इशारे देत सरकारचा गाडा हाकायचा आणि तरीही शिवसेनेच्या धोरणात बदल
दिसणार नसेल तर आक्रमक भूमिका घ्यायची असे ठरत असल्याचे
सूत्राने सांगितले. प्रदेश कार्यकारिणी दोन आठवड्यांत जाहीर झाल्यानंतर पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी सर्वपक्षीय ‘इनकमिंग’ सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते भाजपात येण्यास उत्सुक असून, महापालिका, जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत पार्टी बलवान करण्यासाठी ‘जो येईल, तो आपला’ या पद्धतीने प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत.
भाजपा लढणार नाही! : तासगाव - कवठेमहांकाळ आणि मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार उभा करणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. तासगाव - कवठेमहांकाळ येथे आर.आर. पाटील आणि मुंबईतील वांद्रे पूर्व येथे प्रकाश सावंत यांच्या निधनामुळÞे निवडणूक होत आहे.