संजय शर्मानवी दिल्ली : दक्षिणेतील आपला एकमेव गड कर्नाटक वाचविण्यासाठी भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह १२ केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांना कर्नाटकमध्ये प्रचार दौरे करून संपूर्ण राज्य पिंजून काढण्यास सांगण्यात आले आहे.
कर्नाटकात भाजपने पूर्ण ताकद पणाला लावण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री व पक्षाचे स्टार प्रचारक कर्नाटकच्या २२४ विधानसभा जागांवर प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक आठवड्यात एकदा राज्याचा दौरा असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आठवड्यातील दोन दिवस कर्नाटकात प्रचार करणार आहेत. यानंतर सर्वांत जास्त मागणी योगी आदित्यनाथ यांची आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रचारासाठी १० दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे.
कोण मारणार बाजी?कर्नाटकातील मतदानपूर्व सर्व्हेक्षणातून काँग्रेसकडे सत्ता जाण्याचे संकेत मिळत आहेत.
येडियुरप्पा यांच्यावर मदार
- राजनाथ सिंह, नितीन गडकरी व पियूष गोयल यांनाही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ मागण्यात आला आहे.
- योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, प्रमोद सावंत व मनोहरलाल खट्टर हे चार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कर्नाटकात विविध विधानसभा मतदारसंघांत जाण्यास सांगण्यात आले आहे.
- कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांवर भाजपच्या स्टार प्रचारकांचे कार्यक्रम असावेत, अशी रणनीती आखली जात आहे.
- बी. एस. येडियुरप्पा यांची प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा व्हावी, असेही नियोजन केले जात आहे. येडियुरप्पा हे राज्यातील लिंगायत समुदायाचे दिग्गज नेते मानले जातात.
घोषणा पुढील आठवड्यात?विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नाही. पुढील आठवड्यात कधीही ही घोषणा होऊ शकते, हे लक्षात घेऊन भाजपने केंद्रीय नेत्यांचे दौरे कर्नाटकात आयोजित केले आहेत.
काँग्रेसनेही आखली रणनीतीपूर्वोत्तर राज्यातील निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखली जात आहे. या सर्व राज्यात महिलांसाठी वेगळा जाहीरनामा जारी करण्याची तयारी सुरू आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महिलांसाठी कर्नाटकात मै नेता हूँ अभियान सुरू केले आहे. तसेच, महिलांना दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले आहे.