नवी दिल्ली : कॉन्स्टिट्युशन क्लबच्या सचिवपदासाठी झालेल्या हायप्रोफाइल निवडणुकीत भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी भाजपचेच नेते संजीव बालियान यांचा १०२ मतांनी दारूण पराभव केला. रुडी यांना ३९१ तर बालियान यांना २९१ मते मिळाली. रुडी २५ वर्षापासून क्लबचे सचिव आहेत.
राजीव प्रताप रुडी यांच्या विरोधात भाजपनेच माजी केंद्रीयमंत्री संजीव बालियान यांना मैदानात उतरविले होते. गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मतदान केले.
भाजप हायकमाडसाठी प्रतिष्ठेची होती निवडणूक
महत्वाचे म्हणजे, भाजप हायकमांडसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी भाजपचे राजीव प्रताप रुडी यांच्या बाजूने मतदान केले. क्रीडा सचिवपदी राजीव शुक्ला, संस्कृती सचिवपदी तिरुची शिवा आणि कोषाध्यक्षपदी जितेंद्र रेड्डी यांची बिनविरोध निवड झाली.
कार्यकारी सदस्यांत सेनेचे श्रीरंग बारणे, नरेश अग्रवाल, प्रसून बॅनर्जी, कालिकेश सिंग देव, प्रदीप गांधी, जसबीरसिंग गिल, दीपेंदर हुडा, नवीन जिंदल, एन के प्रेमचंद्रन, प्रदीपकुमार वर्मा आणि आकाश यादव यांचा समावेश आहे