भाजपच मुख्य शत्रू - उद्धव ठाकरेंची सामनातून टीका
By Admin | Updated: October 14, 2014 09:58 IST2014-10-14T08:56:14+5:302014-10-14T09:58:22+5:30
महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा सत्ता प्यारी असलेला भाजपाच आपला मुख्य शत्रू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

भाजपच मुख्य शत्रू - उद्धव ठाकरेंची सामनातून टीका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - कॉंग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे मरून पडलेला साप असल्याने त्यापासून धोका नाही, त्यामुळे आमच्या एकेकाळच्या मित्रांचे ‘ढोंग’ जनतेसमोर आणणे हे महाराष्ट्र हितासाठीचे कर्तव्य असल्याचे सांगत 'भाजपाच' आपला मुख्य शत्रू आहे, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला असून त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा सत्ता प्यारी असल्याचा आरोपही लेखात करण्यात आला आहे. भाजपने खासदार व मंत्री मैदानात उतरवले आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळाचा फौजफाटा महाराष्ट्रात उतरवून शिवसेनेचा पराभव करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. गुजराती बांधवांना फूस लावण्याचे त्यांचे प्रयोग सुरू आहेत, मात्र गुजराती बांधवांची निष्ठा महाराष्ट्र व बाळासाहेबांसोबत आहे, आणि ते सेनेच्याच पाठीशी उभे राहतील असा विश्वासही लेखात व्यक्त करण्यात आला आहे.
बाळासाहेबांचे सुंदर स्मारक बनवू अशी पुडी भाजपाने सोडली आहे, पण दुसरीकडे त्याच भाजपावाल्यांनी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा, विदर्भ तोडायचा निर्धार केला आहे. पण अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता हेच बाळासाहेबांचे सुंदर स्मारक असल्याचे लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. तोफा थंडावल्या म्हणून महाराष्ट्र थंडावला असे होणार नाही. एका जिद्दीने तो पेटलेलाच आहे. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा हिमालय वितळतो असे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढत असल्याने महाराष्ट्रात चौरंगी व पंचरंगी लढतीचा धुरळा उडाला आहे. या बहुरंगात महाराष्ट्राचा नक्की रंग कोणता? अर्थात महाराष्ट्राचा रंग हा फक्त भगवा म्हणजे भगवाच असायला हवा. ज्या दिवशी भगव्या रंगात भेसळ होईल त्या दिवशी महाराष्ट्र आपले सत्त्व गमावून बसेल.
- लोकमान्य टिळकांप्रमाणेच बाळासाहेबांनी महाराष्ट्राला व देशाला जाग आणली, मराठी माणसाला खडबडून जागे केले. महाराष्ट्राच्या धमन्यांत अस्मितेचे निखारे भरले. देशात हिंदू म्हणून प्राण फुंकला. ‘होय, हे हिंदू राष्ट्रच आहे!’ असे बेधडक सांगितले, त्या बाळासाहेबांचा महाराष्ट्र वेडीवाकडी पावले कधीच टाकणार नाही.
- कालपर्यंत मुंबई-महाराष्ट्रात मुलायमसिंग यादव, लालू यादव, भजनलाल वगैरे लोक ‘डेरा’ टाकून आपापल्या जाती व प्रांताच्या मतांचे ‘व्होट बँक’ राजकारण करीत होते. आता म्हणे महाराष्ट्रात संपूर्ण गुजरात उतरवून आमच्या गुजराती बांधवांना ‘फूस’ लावण्याचे प्रयोग सुरू आहेत, पण येथील गुजराती बांधवांची निष्ठा महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच आहे आणि तो त्याच श्रद्धेने शिवसेनेच्या पाठीशी उभा राहणार आहे. राज्याराज्यांचे भाजप खासदार व मंत्री भाजपने खास मैदानात उतरवले आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळाचा फौजफाटा महाराष्ट्रात उतरवून शिवसेनेचा पराभव करण्याचा विडाच त्यांनी उचलला. पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी केंद्रात ज्यांना बसवले ते पाकिस्तानला ज्यांनी कडवट विरोध केला त्यांच्याच मुळावर उठावेत यासारखे दुर्दैव ते कोणते?
- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे कोकणात घुसले व शिवसेनेला मराठी अस्मितेचे धडे देऊ लागले, पण त्यांनी मराठी अस्मितेचे काय दिवे लावले आहेत? विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचे वचन आपण दिले होते व सत्तेवर येताच त्या वचनांना हरताळ फासून मराठीला कचर्यात फेकले. मग आज कोणत्या तोंडाने महाराष्ट्रात ‘मराठी मराठी’ करीत फिरत आहात? कर्नाटकात मराठी सीमा बांधवांवर अत्याचार करणार्या येडीयुरप्पाला महाराष्ट्रात प्रचारास आणले. यापेक्षा महाराष्ट्राचा व १०५ हुतात्म्यांचा अपमान तो कोणता? पण जो तो आपापल्या पद्धतीने व्होट बँकेचे राजकारण करीत आहे.
- कालपर्यंत राज्याराज्यांतील अनेक प्रादेशिक पक्षांबरोबर भाजपने जो उत्सवी सोहळा केला ते ढोंग व खोटारडेपणा होता, प्रेमाचे नाटक होते असेच म्हणावे लागेल. निकालानंतर त्यांच्यावर फक्त ‘तमाकू’ चोळत बसण्याचीच वेळ येणार आहे.
- एका बाजूला महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकायच्या, मुंबईचे महत्त्व कमी करायचे, विदर्भ तोडायचाच हा निर्धार करायचा व दुसर्या बाजूला बाळासाहेबांचे सुंदर स्मारक उभारण्याची पुडी सोडायची. अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता हेच बाळासाहेबांचे सुंदर स्मारक आहे.
- भाजपातील आमचे सर्व मित्र एकतर गोंधळून गेले आहेत किंवा सत्तेच्या अतिलोभाने बहकले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधाने सुरू आहेत. ‘‘शिवसेना नक्की कोणाशी लढत आहे? शिवसेनेचा खरा शत्रू कोण असा प्रश्न आता भाजपावाले विचारतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे मरून पडलेला साप आहे. त्या सापापासून धोका नाही हे आम्ही स्पष्ट करीत आहोत. त्यामुळे आमच्या एकेकाळच्या मित्रांचे ‘ढोंग’ जनतेसमोर आणणे हे महाराष्ट्र हितासाठी आम्ही कर्तव्यपालन मानतो. तोफा थंडावल्या आहेत हे खरे, पण तोंडाच्या वाफा दवडणार्यांना व तोफा समजून पिचकार्या मारणार्यांना जमालगोटा द्यावाच लागेल.