भाजपची यंत्रणा आग विझविण्याच्या कामाला!
By Admin | Updated: November 9, 2015 22:59 IST2015-11-09T22:59:56+5:302015-11-09T22:59:56+5:30
बिहारमध्ये पानिपत होताच संघ परिवारात तलवारी बाहेर निघाल्या आहेत. भाजप संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आग विझविण्याचा प्रयत्न झाला.

भाजपची यंत्रणा आग विझविण्याच्या कामाला!
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
बिहारमध्ये पानिपत होताच संघ परिवारात तलवारी बाहेर निघाल्या आहेत. भाजप संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आग विझविण्याचा प्रयत्न झाला. पक्षश्रेष्ठींना थेट आव्हान देणारे शॉटगन खा. शत्रुघ्न सिन्हा, आर.के. सिंग यांच्यावर कारवाईची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात होती, प्रत्यक्षात चर्चाही झाली नाही. एकूणच ही प्रदीर्घ बैठक केवळ सारवासारव करणारी ठरली.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणासंबंधी विधानावर जोरदार टीका होऊन खापर त्यांच्या माथी फोडण्याचे चिन्ह दिसत असताना, या बैठकीत त्यांचा भक्कम बचाव करण्यात आला. विशेषत: भाजपच्या मित्र पक्षांनी जितनराम मांझी(हम), रामविलास पासवान (लोजपा) अनुप्रिया पटेल (अपना दल) किंवा भाजपचेच हुकूमदेव नारायण यादव यांनी भागवत यांच्या विधानावर जाहीरपणे टीका केली होती. सोमवारच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली भागवत यांच्या भक्कम बचावाला समोर आले. कोणत्याही एखाद्या नेत्याच्या एखाद्या विधानामुळे बिहार निवडणुकीच्या निष्पत्तीवर परिणाम झालेला नाही, असे सांगत त्यांनी भागवत यांना दोष देण्याचे टाळले.
तीन पक्षांच्या एकजुटीमुळे पराभव
जेडीयू, राजद आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एकत्र येणे हे रालोआच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण झाल्याचा दावा जेटलींनी केला. २०१४ मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यामुळे या तिन्ही पक्षांना जबर फटका बसला होता. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा राजीनामा घेण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली. आम्ही चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. आम्ही देशात अन्यत्रही चांगली कामगिरी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले