भाजपामध्ये बंडखोरीची शक्यता, पटेल नेतेही काँग्रेसवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:01 AM2017-11-21T04:01:02+5:302017-11-21T04:01:19+5:30

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पटेल, दलित व ओबीसींना आपल्या बाजूने एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी पटेल समाजात अद्याप नाराजी आहे

BJP likely to rebel, Patel leader also angry at Congress | भाजपामध्ये बंडखोरीची शक्यता, पटेल नेतेही काँग्रेसवर नाराज

भाजपामध्ये बंडखोरीची शक्यता, पटेल नेतेही काँग्रेसवर नाराज

googlenewsNext

हरीश गुप्ता / महेश खरे 
नवी दिल्ली/ अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पटेल, दलित व ओबीसींना आपल्या बाजूने एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी पटेल समाजात अद्याप नाराजी आहे, तर अनेक मंत्री व आमदारांना नाकारून काँग्रेस नेत्यांना उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये असंतोष आहे. काँग्रेसने नाकारल्याने राष्ट्रवादीची तिथे स्वतंत्र चूल आहे आणि दुसरीकडे शिवसेनाही रिंगणात आहे. त्यामुळे तेथील राजकारणात रंग भरू लागला आहे.
काँग्रेसला ९ डिसेंबर रोजी होणाºया मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ७७ उमेदवारांच्या यादीत पटेल समाजाला प्रतिनिधित्व दिले असले तरी पाटीदार अनामत समिती नाराज आहे. त्यांनी २० जागांची मागणी केली होती आणि यादीत त्यांच्या २ जणांची नावे आहेत.
ही यादी जाहीर झाल्यानंतर पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री सूरतमध्ये काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. या समितीचे संयोजक अल्पेश कथिरिया म्हणाले की, काँग्रेसने विश्वासात न घेता आमच्या दोन उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यांनी यादीत ज्या अन्य पटेल उमेदवारांचा समावेश केला आहे, ते बोगस आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.
पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र व दक्षिण गुजरातच्या ८९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांना पोरबंदमधून, माजी विरोधी पक्षनेते शक्तिकांत गोहिल यांना मांडवीतून व विद्यमान आ. इंद्रनील राज्यगुरू यांना मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याविरुद्ध राजकोट पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. हार्दिक पटेल यांच्या पाटीदार समितीच्या ज्या दोन जणांना तिकीट देण्यात आले आहे, त्यात धोराजीतून ललित वासोया व जुनागढमधून अमित थुम्मर यांचा समावेश आहे.
>राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गुजरातमधील १० वर्षांच्या आघाडीतही बिघाड झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने आपण हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी यांच्याशी चर्चेत व्यग्र असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवले. त्यामुळे नाराज प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा पक्ष १८२ जागा लढवेल आणि उमेदवारांची घोषणा उद्यापर्यंत होईल, असे सांगितले.
या घडामोडींना अलीकडील संदर्भ आहेत. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नव्हता. राष्ट्रवादीच्या दोनपैकी एका सदस्याने अहमद पटेल यांचे समर्थन केले, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. शरद पवार यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्याने सर्व सुरळीत असल्याचे मानले जात होते. पण तसे चित्र गुजरातेत दिसत नाही. मात्र विरोधकांच्या १८ पक्षांच्या आघाडीत या दोन पक्षांचा समावेश आहे.
काँग्रेससाठी पाटीदार समुदाय जमेची बाजू
भाजपापासून दूर झालेला पाटीदार समाज काँग्रेस व मित्र पक्षांकडे गेला आहे. काँगे्रससाठी ही जमेची बाजू आहे. आरक्षण आंदोलनात याच समुदायाने सत्तेचे सिंहासन हलविले व आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.
भाजपाने यंदा ३२ आमदारांना तिकीट नाकारून काँग्रेसमधून आलेल्यांना स्थान दिले आहे. शिवसेनाही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ६० ते ७० जागांवर लढणार आहे. त्यामुळे भाजपावर याचा परिणाम होऊ शकतो. तर, राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे काँग्रेसवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
>भाजपाने ३ मंत्र्यांसह
१६ आमदारांना वगळले
भाजपाने तिसºया यादीत ३ मंत्र्यांसह १६ आमदारांना तिकीट नाकारले. जयंती कवडिया, वल्लभ वाघासिया व नानू वानानी या मंत्र्यांना वगळले आहे. आ. जेठा सोळंकी यांना वगळल्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपा सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आ. वसुबेन त्रिवेदी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फाल्दू यांना उमेदवारी मिळाली.
>रूपाणींचा अर्ज दाखल; नांदेडचा बँड-बाजा
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते म्हणाले की, काँग्रेसने तीन प्रमुख संघटनांच्या नेत्यांना ‘आउटसोर्स’ केले आहे. त्यांच्याकडे स्वत:चे काहीही नाही. नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरात नव्या उंचीवर जाईल. रूपाणी यांनी अर्ज भरला तेव्हा नांदेडहून बँड-बाजा बोलावला होता.
>हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश
हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी हे क्रमश: पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाचे नेते यंदा काँग्रेससोबत आहेत. गुजरातमध्ये पाटीदार २० टक्के, ओबीसी ५१ टक्के व दलित समाज १० टक्के आहे. काँग्रेसचे तिकीटवाटप सुरळीत झाल्यास भाजपासाठी ते आव्हान असेल. मोदी यांची जादू काँग्रेस कशी रोखणार, ते येणारा काळच सांगणार आहे.

Web Title: BJP likely to rebel, Patel leader also angry at Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.