काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा दावा भाजपाने सोडला
By Admin | Updated: January 6, 2015 01:59 IST2015-01-06T01:59:03+5:302015-01-06T01:59:03+5:30
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) चर्चेची तयारी दर्शविताच भाजपाने नरमाईची भूमिका स्वीकारली आहे.
काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा दावा भाजपाने सोडला
नरमाईची भूमिका : ‘पीडीपी’कडून उपमुख्यमंत्रिपद
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतील संदिग्ध जनादेशामुळे सरकार स्थापण्याबाबत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) चर्चेची तयारी दर्शविताच भाजपाने नरमाईची भूमिका स्वीकारली आहे. मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडतानाच उपमुख्यमंत्रिपद आणि निम्मी मंत्रिपदे मिळाल्यास पक्ष समाधानी असेल, असे संकेत सोमवारी
मिळाले.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेश भाजपाच्या कोअर गटासोबत चर्चा करीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला सरचिटणीस राम माधव, जम्मू-काश्मीरचे प्रभारी अविनाश राय खन्ना, प्रदेशाध्यक्ष जुगुलकिशोर शर्मा, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री इंद्रजित सिंग उपस्थित होते.
‘पीडीपी’ने युती सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमासाठी दबाव आणला आहे. मात्र, या पक्षाकडून चर्चेसाठी पुढाकार घेण्याचे संकेत मिळल्यानंतर प्रदेश भाजपाच्या नेत्यांनी सोमवारी पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत केली. शहा यांच्याकडून हिरवा झेंडा मिळताच ‘पीडीपी’सोबत चर्चा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
हट्ट नाही
प्रारंभापासून भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये पक्षाचा पहिला मुख्यमंत्री होण्यासाठी आटापिटा चालविला होता. ‘पीडीपी’ने त्यांच्या
मागणीला भीक घातली नाही. दोन आठवडे तिढा कायम राहिल्यानंतर भाजपाने उपमुख्यमंत्रिपद आणि निम्म्या मंत्रिपदावर राजी असल्याचे स्पष्ट केले. ‘पीडीपी’कडून सकारात्मक पुढाकाराचे संकेत मिळाले
आहेत. चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही अन्य मुद्यांवर सल्लामसलत केली आहे, असे राम माधव यांनी सांगितले.