महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरून राजकारण जबरदस्त तापताना दिसत आहे. भाजपने शनिवारी (३० नोव्हेंबर २०२४) ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यावरून काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यायला हवा. सर्वप्रथम राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि आता बॅलेट पेपर परत आल्यानंतर आपण निवडणूक लढू, अशी घोषणा करायला हवी, असे भाजपने म्हटले आहे.
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, जर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला, तर ते त्यांच्याकडून उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्याला प्रतिबिंबित करेल. काँग्रेसचे आरोप पोकळ शब्दांशिवाय काहीही नाही. एवढेच नाही तर भाटिया यांनी काँग्रेसला या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचाही सल्ला दिला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षांत, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शिता आणि इलेक्टोरल व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेसंदर्भात अनेक वेळा क्लीन चिट दिली आहे.
काँग्रेस फक्त पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील -भाटीया म्हणाले, “काँग्रेसचे मुख्यमंत्री, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी राजीनामा द्यावा कारण ते त्याच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले आहेत, ज्यावर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रियांका गांधी वड्रा यांनी केरळच्या वायनाडमधून नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ घेतली, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. हे "विडंबन" आहे. काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील."