उत्तर प्रदेशात भाजपा नेते, कार्यकर्ते टार्गेट
By Admin | Updated: June 17, 2014 00:11 IST2014-06-17T00:11:31+5:302014-06-17T00:11:31+5:30
उत्तर प्रदेशमध्ये मागील दहा दिवसांत भाजपाच्या पाच नेत्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. भाजपा नेते राकेशकुमार रस्तोगी यांचा मृतदेह रविवारी बरेली जिल्ह्यात आढळला

उत्तर प्रदेशात भाजपा नेते, कार्यकर्ते टार्गेट
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये मागील दहा दिवसांत भाजपाच्या पाच नेत्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. भाजपा नेते राकेशकुमार रस्तोगी यांचा मृतदेह रविवारी बरेली जिल्ह्यात आढळला. त्यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
गेल्या दहा दिवसांत भाजपाच्या दोन नेत्यांची हत्या झाली आणि भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी निरंजन ज्योती प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या. याशिवाय एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या आईवर गोळी झाडण्यात आली.
दरम्यान भाजपा नेते ओम वीरसिंग यांच्या हत्येच्या संदर्भात पोलिसांनी मुजफ्फरनगर येथे आणखी दोन संशयितांना सोमवारी अटक केली. वीरसिंग यांच्या हत्येच्या वेळी मारेकऱ्यांनी त्यांची रिव्हाल्व्हर हिसकावून नेली होती. ती जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
याआधी पोलिसांनी मोनू नावाच्या आरोपीला अटक केली होती. आणखी दोन आरोपी गुरबीर व राहुल यांचा पोलीस शोध घेत आहेत.
४७ वर्षीय वीरसिंग हे निवृत्त सैनिक असल्याने त्यांना ‘फौजी’ म्हणून ओळखले जात होते. ते १० जूनला सकाळी फिरायला गेले असताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)