मनसेचा आराखडा भाजपा राबवतेय

By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:25+5:302015-06-29T00:38:25+5:30

राज ठाकरे : राज्य सरकार केवळ घोषणाबाज

The BJP is implementing the MNS plan | मनसेचा आराखडा भाजपा राबवतेय

मनसेचा आराखडा भाजपा राबवतेय

ज ठाकरे : राज्य सरकार केवळ घोषणाबाज
सावंतवाडी : मी मांडलेला विकास आराखडाच भाजपा सरकार राबवत आहेत. काँग्रेसप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही घोषणाबाज असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
कोकण दौर्‍यावर आलेल्या ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री घोषणाबाज आहेत. ते कोकण नंबर वन करणार म्हणजे नेमके काय करणार? त्यांच्याकडे काय आहे? माझ्या हातात जर सत्ता दिली असती, तर या सुजलाम सुफलाम कोकणचे सोने केले असते. कोकणसारखा प्रदेश असणे हे आपले भाग्य आहे, पण त्याला योग्य दिशा मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माझा टोलला विरोध नाही, पण तो घेताना १० कोटींच्या आतील रस्त्यावर आकारू नका. त्याची एक प्रक्रिया राबवा. बाहेरील देशात टोल आहेत. तेथे एटीएम सिस्टीम असून तेथे रस्त्यावर टोल भरावा लागत नाही. त्याची थेट पावती मिळते, असे माझे म्हणणे आहे. पण सरकारला पारदर्शकता नको आहे, असेही ते म्हणाले.
मी निवडणुकीत मांडलेला आराखडा भाजपा सरकार राबवत आहे. अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी उचलल्या आहेत, असाही दावा त्यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये होणार्‍या चिपी विमानतळाबाबत माझ्या मनात संशय आहे. प्रकल्पाला योग्य दिशा दिलेली नाही. लोकांना फसवण्याचे काम सरकार करत असून विमानतळाला जोडणारे रस्ते नाहीत. विमान कुठे उतरणार, हे माहीत नाही. फक्त ठेकेदारी वाटण्याचेच काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP is implementing the MNS plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.