भाजपाचा शिवसेनेला प्रस्ताव नाही
By Admin | Updated: October 21, 2014 03:02 IST2014-10-21T03:02:16+5:302014-10-21T03:02:16+5:30
अपक्ष व छोटे पक्ष यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत

भाजपाचा शिवसेनेला प्रस्ताव नाही
मुंबई : अपक्ष व छोटे पक्ष यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. निवडणूक निकालानंतर २४ तास उलटले, तरीही भाजपाने सत्तेत सहभागी होण्याचा कुठलाही प्रस्ताव शिवसेनेकडे धाडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी पक्षात बसायचे, या निर्णयाचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत जनतेच्या आभाराचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी यंदाची निवडणूक कशी वेगवेगळ््या अर्थाने महत्वाची होती ते स्पष्ट केले. ‘भाजपाकडून अजून कुठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
आपण सरकारला पाठिंबा देण्याचा प्रश्न अहंकाराचा विषय केलेला नाही. भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा दूरध्वनी केला होता. त्यांनी काही सन्मानजनक प्रस्ताव पाठवला तर त्यावर शिवसेना नक्की विचार करील.
मात्र त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार बनवायचे असेल तर ते बनवू शकतात,’ असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तशीच वेळ आली तर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवावी लागेल, असे संकेत उद्धव यांनी दिले. येत्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर जिंकण्याच्या तयारीला लागण्याचे आवाहन उद्धव यांनी केले.