विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारयांद्यामधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मु्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच आता बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे दोन विधानसभा मतदारसंघात मतदार असल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्लीतील राजकारण बोगस मतदार आणि मतदारयाद्यांमधील घोळामुळे तापलेले असताना आता बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नवा बॉम्ब फोडला. बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव असल्याचे आणि त्यांच्याकडे दोन ओळखत्र असल्याचे त्यांनी पुरावे दाखवले.
मोदींचे खास उपमुख्यमंत्री
तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर भाजपचे बिहारमधील उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन्ही मतदारसंघातील यादीमध्ये असलेल्या नावाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'हे आहेत मोदीजींचे खास बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा', असे म्हणत तेजस्वी यादव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत.
निवडणूक आयोगाची सिन्हा यांना नोटीस
केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत विजय सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी पडताळणी कार्यक्रमानंतरही आपले नाव बांकीपूर विधानसभा मतदारसंघ आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी आढळून आले आहे. या प्रकरणी १४ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे आयोगाने म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री विजय सिन्हा काय म्हणाले?
तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोलताना विजय सिन्हा म्हणाले, जेव्हा आम्ही पाटण्यातील कदमकुआ परिसरात राहत होतो, तेव्हा संपूर्ण कुटुंबातील मतदार असलेल्या सदस्यांची नावे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात होती.
एप्रिल २०२४ लखीसराय विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत नावांचा समावेश करावा म्हणून अर्ज भरला होता. त्याचवेळी बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून नावे हटवण्यात यावीत, म्हणूनही फॉर्म भरलेला. कुठल्यातरी कारणामुळे नाव वगळले गेले नाही आणि मतदार पुर्नपडताळणीनंतरही नाव तशीच राहिली आहेत. हे समजल्यावर पुन्हा बीएलओंना बोलवून नाव वगळावी म्हणून सांगितलं. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असे उपमुख्यमंत्री सिन्हा म्हणाले.