पराभवानंतर भाजप वरमली
By Admin | Updated: February 12, 2015 23:11 IST2015-02-12T23:11:28+5:302015-02-12T23:11:28+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या भाजपने आता आपल्या चुकांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे.

पराभवानंतर भाजप वरमली
हरीश गुप्ता, दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या भाजपने आता आपल्या चुकांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. हा पराभव अत्यंत अवमानजनक असल्याकारणाने पक्ष कुणा एका व्यक्तीवर त्याची जबाबदारी टाकण्यास तयार नाही. बदल दिसू लागलेला आहे, असे दिल्ली निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीची शुक्रवारी समीक्षा करणार असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांना चहाचे निमंत्रण देऊन आपला पूर्ण पाठिंबा देऊ केला असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या सहकाऱ्यांनीही केजरीवाल यांचे तेवढेच जोशपूर्ण स्वागत केले आहे. त्यामुळे भाजप आणि आप यांच्यात संघर्ष अटळ असल्याची चर्चा आता काही काळासाठी तरी मागे पडल्यासारखे दिसत आहे.
उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा जिंकल्यानंतर आणि एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये विजय मिळविल्यानंतर कधीही मागे वळून न पाहणारे भाजप अध्यक्ष अमित शहा आता दिल्लीतील पराभव झाल्यापासून नरमले आहेत आणि हा बदल त्यांच्यात दिसू लागला आहे. अहमदाबाद येथे बुधवारी पार पडलेल्या आपल्या पुत्राच्या विवाहानंतर त्यांनी १५ फेब्रुवारीला साध्या स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात २० केंद्रीय मंत्री आणि १२० खासदार तैनात करण्याचा निर्णयही चुकीचाच होता, याची जाणीव आता भाजपला झालेली आहे.