Delhi Elections 2025: पंजाबमधील महिलांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनानंतर अरविंद केजरीवालांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्ला चढवला. आप विरोधात भाजप आणि काँग्रेस मिळून काम करत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"काँग्रेसने आमची काळजी करू नये", असे म्हणत अरविंद केजरीवाल म्हणाले. "आंदोलन करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या त्यांच्याच (भाजप, काँग्रेस) आहेत. त्या पंजाबमधून आलेल्या नाहीत. पंजाबमधील महिला आमच्यासोबत आहेत. त्यांचा आप वर विश्वास आहे", असे केजरीवाल म्हणाले.
"आप विरोधात आम्ही एकत्रित निवडणूक लढवत आहोत, असे भाजप आणि काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर करावे", असा हल्ला केजरीवालांनी काँग्रेस भाजपवर केला.
आम आदमी पक्षाचे सरकार सातत्याने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. दिल्लीत १२ लाख कुटुंबांना मोफत पाणी पुरवले जात आहे. मी तुरुंगात गेल्याने काहींना बिले आली आहेत. पण, आमचे सरकार येताच सर्वांची बिले माफ केली जाईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.
महिलांनी केजरीवालांच्या घराबाहेर का केले आंदोलन?
पंजाबमधून आल्याचा दावा करत महिलांनी केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन केले. आपच्या पंजाबमधील सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना महिन्याला १००० रुपये देण्याचे आश्वासन पूर्णे केले नाही, असा आरोप या महिलांनी केला. तीच योजना लागू करण्याची तयारी आपच्या दिल्लीतील सरकारने सुरू केली असल्याचे या महिलांनी म्हटले आहे.