हरीश गुप्ता
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या असून, दहा दिवसांनंतरही दिल्लीचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. दिल्लीतील १० वर्षांची ‘आप दा’ दूर करीत भाजपने ही निवडणूक जिंकली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर एव्हाना भाजपने मुख्यमंत्रिपदावर निवड करीत सरकार सुरू करणे अपेक्षित होते. परंतु ८ फेब्रुवारी रोजी निकाल लागल्यानंतर अद्यापही मुख्यमंत्र्यांची निवड झालेली नाही.
पक्षाच्या निरीक्षकांची नावे कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख जे. पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते कोणत्याही क्षणी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. निरीक्षक हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत आमदारांची मते जाणून घेतील.
दिल्ली भाजप प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे की, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाची निवड ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. केंद्रीय नेतृत्व निरीक्षक पाठवतील व निर्णय घेतला जाईल. सोमवारी भाजप आमदार त्यांचा नेता निवडण्यासाठी बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार?
जाट नेते प्रवेश वर्मा यांना मुख्यमंत्री करावे, असा आग्रह धरणारा भाजप आमदारांत एक मजबूत गट आहे. कारण, या निवडणुकीत प्रथमच १० जाट नेते विजयी झाले आहेत. दलित मुख्यमंत्र्यांची निवड करावी, असे मानणाराही एक गट आहे.
दिल्लीत १२ एससी जागांपैकी भाजपने केवळ ४ जागा जिंकल्या आहेत व या पक्षाचा या वर्गाचा जनाधार वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. भाजपने कोणत्याही राज्यात दलित मुख्यमंत्री नियुक्त केलेला नाही. त्यामुळे हाही एक प्रबळ मतप्रवाह आहे.