Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, चिदंबरम सतत पाकिस्तानचा बचाव का करत आहेत? काँग्रेस नेहमीच स्वतःच्या सुरक्षा संस्थांवर प्रश्न का उपस्थित करते? त्यांच्याकडून जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी निर्यात करणाऱ्या देशावर कधीच प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत?
शोभा करंदलाजे पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानचा भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याचा दीर्घ आणि रक्तरंजित इतिहास आहे. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. तरीही काँग्रेसने अशा घृणास्पद कृत्यांना वारंवार कमी लेखले आहे. चिदंबरम त्यांच्या विधानातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत? तुम्हाला भारताच्या शूर सैन्यापेक्षा आयएसआयवर जास्त विश्वास आहे का? राष्ट्रीय हितापेक्षा राजकीय द्वेष महत्त्वाचा आहे का? असे दिसते की, काँग्रेसच्या डीएनएमध्ये काही गंभीर दोष आहेत. त्यामुळेच ते नेहमी भारतावर संशय घेतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
चिदंबरम काय म्हणाले?चिदंबरम यांनी अलिकडेच म्हटले होते की, गेल्या काही आठवड्यात एनआयएने काय केले आहे, हे सरकार सांगण्यास तयार नाही. त्यांनी दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ते कुठून आले? ते देशातच तयार झालेले दहशतवादी आहेत का? पाकिस्तानातून आले आहेत असे तुम्ही का गृहीत धरले? याचा कोणताही पुरावा नाही. भारताचे झालेले नुकसानही सरकार लपवत आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी आरोप केला की, सरकारने देशाला विश्वासात घेतले नाही. पंतप्रधानांनी सांगितले की, ही कारवाई थांबवण्यात आली आहे, संपलेली नाही. जर असे असेल तर त्यानंतर सरकारने कोणती पावले उचलली आहेत? पहलगामसारखा दुसरा हल्ला रोखण्यासाठी मोदी सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत का? पंतप्रधान मोदी याबद्दल का बोलत नाहीत? असेही त्यांनी म्हटले.