भाजप व हरियाणा जनहित काँग्रेसची युती तुटली
By Admin | Updated: August 28, 2014 12:33 IST2014-08-28T12:33:20+5:302014-08-28T12:33:33+5:30
हरियाणात भाजपसोबत युती असलेल्या हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपशी काडीमोड घेतला आहे. भाजपने धोका दिल्याचा आरोप हरियाणा जनहित काँग्रेसचे प्रमुख कुलदिप बिश्नोई यांनी केला आहे.

भाजप व हरियाणा जनहित काँग्रेसची युती तुटली
ऑनलाइन लोकमत
चंडीगढ, दि. २८ - पोटनिवडणुकांमधील पराभवानंतर आता भाजपप्रणीत एनडीएमध्ये फुट पडायला सुरुवात झाली आहे. हरियाणात भाजपसोबत युती असलेल्या हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपशी काडीमोड घेतला आहे. भाजपने धोका दिल्याचा आरोप हरियाणा जनहित काँग्रेसचे प्रमुख कुलदिप बिश्नोई यांनी केला आहे.
महाराष्ट्रासोबतच हरियाणातही विधानसभा निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या पोटनविडणुकीत भाजपला हरियाणा, बिहार, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर हरियाणातील भाजपचा मित्रपक्ष हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपशी तीन वर्षांपासून सुरु असलेला घरोबा संपुष्टात आणला आहे. 'आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मनापासून मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यावर भर दिले. मात्र भाजपने आम्हाला नेहमी धोका दिला. आम्हाला हिन वागणूक देण्यात आली' असे बिश्नोई यांनी सांगितले. भाजपने युती धर्म पाळला नाही असेही त्यांनी नमूद केले.
हरियाणा विधानसभेत हरियाणा जनहित काँग्रेसला ९० पैकी ४५ जागा द्याव्यात आणि बिश्नोई यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी हरियाणा जनहितने भाजपकडे केली होती. मात्र भाजपने या दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत हरियाणातील दहा जागांपैकी 8 जागा भाजपने तर २ जागा हरियाणा जनहितने लढवल्या होत्या. यातील ७ जागांवर भाजपने विजय तर मिळवला होता. तर हरियाणा जनहितला दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पराभूतांमध्ये पक्षाचे प्रमुख बिश्नोई यांचादेखील समावेश होता. यावरुनच दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर एनडीएत फाटाफूट होण्याची ही पहिलीच घटना आहे.