भ्रष्टाचार ही आपल्याकडील शासन आणि प्रशासनामध्ये घुसलेली गंभीर समस्या आहे. हा भ्रष्टाचार आपल्या व्यवस्थेमध्ये वरपासून खालपर्यंत मोठ्या प्रमाणावर मुरला आहे. तसेच कुणी कितीही दावे केले तरी त्याला आळा घालणं कुणालाही शक्य झालेलं नाही. दरम्यान, छत्तीसगडमधून भ्रष्टाचाराची अशीच एक घटना समोर आली आहे. येथे भ्रष्टाचारांनी चक्क सिमेंटच्या दुकानातून महिलांच्या कॉस्मेटिक्सचं सामान खरेदी केलं. तसेच फेब्रुवारी महिन्यात ३० तारखेचं बिल काढून लाखो रुपयांची अफरातफर केली. आता या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे.
छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेमधील सामुहिक विवाहाच्या नावाखाली महिला आणि बालकल्याण विभागाने मोठ्या प्रमाणावर अफरातफर केली आहे. विभागाने काढलेल्या बिलांमध्ये ३० फेब्रुवारी अशी तारीख नोंदवली आहे. एवढंच नाही तर सामुहिक विवाहामध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्याही बनावट दाखवण्यात आली आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी कॉस्मेटिक्सचं जे सामान खरेदी करण्यात आलं त्याची खरेदी चक्क सिमेंटच्या दुकानातून करण्यात आली आहे. दरम्यान, ही कागदपत्रं जेव्हा लोकांच्या हाती लागली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. यामध्ये सुरुवातीला सरकारी खात्यांमधून रक्कम खासगी खात्यांमध्ये पाठवण्यात आली. त्यानंतर फोन पे, डिजिटल पे सारख्या माध्यमातून संबंधित व्यक्तींच्या खात्यात वळवण्यात आली.
आयटीआयमधून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. एका स्थानिकाने माहितीच्या अधिकारांतर्गत याबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर म्हणून महिला आणि बालकल्याण विभागाकडून जी कागदपत्रे प्राप्त झाली त्यामधू या प्रकरणाचे बिंग फुटले. बालोद जिल्ह्यातील डौंडी योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री सामुहिक कन्या विवाहाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जी बिलं काढण्यात आली त्यामध्ये ३० फेब्रुवारी अशी तारीख नोंदवली होती. हे पाहून सारेच अवाक् झाले. तसेच हा घोटाळा आता चर्चेचा विषय ठरला असून, त्यान अनेक जण सहभागी असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, महिला आणि बालकल्याण विभागाकडे याबाबत विचारणा केली असता जी कागदपत्रं समोर आली आहेत. त्यांच्या आधारावर तपास केला जाईल. जर घोटाळा झाल्याचे समोर आले तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.