विमा विधेयकावर अखेर संसदेची मोहोर
By Admin | Updated: March 12, 2015 23:58 IST2015-03-12T23:58:11+5:302015-03-12T23:58:11+5:30
सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा उपायांमध्ये सामील असलेल्या विमा क्षेत्रात विदेशी थेट गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा २६ वरून

विमा विधेयकावर अखेर संसदेची मोहोर
नवी दिल्ली : सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा उपायांमध्ये सामील असलेल्या विमा क्षेत्रात विदेशी थेट गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची तरतूद असलेल्या विमा विधेयकाला गुरुवारी संसदेची मंजुरी मिळाली.
लोकसभेत आधीच या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. गुरुवारी राज्यसभेत विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१५ ला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. या विधेयकावर तिन्ही डाव्या पक्षांनी मांडलेल्या दुरुस्त्या १० विरुद्ध ८४ मतांनी फेटाळण्यात आल्या.
विधेयक पारित होण्याआधी तृणमूल काँग्रेस, बसपा, द्रमुक आणि संयुक्त जनता दल सदस्यांनी विधेयकाचा विरोध करीत सभात्याग केला.
आर्थिक सर्वसमावेशकतेच्या प्रक्रियेस विमा क्षेत्रातील एफडीआयमुळे मोठी चालना मिळणार आहे. विमा क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविल्यामुळे अंदाजे २०,००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पेन्शन क्षेत्रातही एफडीआय मर्यादा वाढविणे गरजेचे आहे, अशा शब्दांत भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी या मंजुरीचे स्वागत केले.
मंडलिक यांना श्रद्धांजली
लोकसभेने आज दोन दिवंगत माजी सदस्य सदाशिवराव मंडलिक आणि राम सुंदर दास यांना श्रद्धांजली वाहिली. कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दोन्ही माजी सदस्यांच्या निधनाची सभागृहाला माहिती दिली.
मंडलिक यांनी बाराव्या, तेराव्या, चौदाव्या आणि पंधराव्या लोकसभेत महाराष्ट्राच्या कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्यही होते. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले.
मंडलिक यांचे १० मार्च २०१५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.
राम सुंदर दास यांनी दहाव्या आणि पंधराव्या लोकसभेत बिहारच्या हाजीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या ६ मार्च रोजी त्यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)