विस्तारात यूपी, बिहारचा वरचष्मा!
By Admin | Updated: November 10, 2014 04:40 IST2014-11-10T04:40:52+5:302014-11-10T04:40:52+5:30
शपथविधी समारंभावर शिवसेनेने घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला

विस्तारात यूपी, बिहारचा वरचष्मा!
नवी दिल्ली : शपथविधी समारंभावर शिवसेनेने घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, हंसराज अहिर, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू, जे.पी. नड्डा आणि वीरेंद्र सिंग यांच्यासह २१ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. लोकसभेत भाजपाचे ७३ खासदार पाठविणा-या उत्तर प्रदेशचा आणि विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेल्या बिहारचा स्पष्ट प्रभाव या विस्तारावर आहे. पर्रीकर, प्रभू व नड्डा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणाला मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार दिल्याने सेनेचे अनिल देसाई यांना शपथ न घेताच मुंबईत परत यावे लागले.
या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४५वरून ६६वर पोहोचली आहे. यात पंतप्रधानांसह २७ कॅबिनेट दर्जाचे, १३ राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार असलेले आणि २६ राज्यमंत्री दर्जाचे सदस्य आहेत. बंडारू दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी आणि गौतम बुद्धनगरचे खासदार महेश शर्मा यांचा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून समावेश करण्यात आला आहे. रुडी व दत्तात्रय दोघे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. १४ नव्या राज्यमंत्र्यांमध्ये मुख्तार अब्बास नकवी, रामकृपाल यादव, हरिभाई पारथीभाई चौधरी, सांवरलाल जाट, मोहनभाई कल्याणजीभाई कुंडारिया, गिरिराज सिंह, हंसराज गंगाराम अहिर, प्रा. रामशंकर कठेरिया, जयंत सिन्हा, राज्यवर्धन सिंह राठौड, बाबुल सुप्रियो, साध्वी निरंजन ज्योती, विजय सांपला (सर्व भाजपा) आणि वाय. एस. चौधरी (तेदेपा) यांचा समावेश आहे.
आपण कोणत्याही प्रकारची बंडखोरी वा नाराजी खपवून घेणार नाही आणि आपल्याला कुणी निर्देश देऊ शकत नाही हेही मोदी यांनी शिवसेनेला दूर ठेवून दाखवून दिले आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, राज्यसभेचे उपसभापती जे. पी. कुरियन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी व भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसचा कोणताही नेता शपथविधी समारंभाला उपस्थित नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अन्य भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. शपथविधी समारंभाला जाण्याआधी मोदी यांनी नव्या मंत्र्यांना आपल्या ७, रेसकोर्स या निवासस्थानी चहापान दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)