Bihar News: महादेवाचा पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. देशभरातील भाविक मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण, या महिन्यात अनेक ठिकाणी सापाचे दर्शन होते. बिहारमधील एका घरातून साप निघाल्याची विचित्र घटना घडली आहे. तुम्ही म्हणाल, साप तर कुठेही निघतात, त्यात काय नवीन? तर, या घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल ६० हून अधिक कोब्रा नाग निघाले आहेत.
बिहारमधील बगाहामधील लक्ष्मीपूर गावातील एका घरातून तीन दिवसांत ६० हून अधिक नाग निघाल्याने संपूर्ण गाव दहशतीत आहे. विनोद यादव आपल्या कुटुंबासह या घरात राहतात. शेताशेजारी असलेले हे घर आता 'सापांचे घर' म्हणून परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. विनोद यादव म्हणतात की, गेल्या काही दिवसांपासून रात्री घरात खडखडाटाचे आवाज येत होते. सुरुवातीला कुटुंबाने दुर्लक्ष केले, परंतु जेव्हा एकामागून एक साप दिसू लागले तेव्हा गोंधळ उडाला.
घराखाली नागचे बिळ सापडलेघाबरलेल्या विनोदने गावकऱ्यांना हे सांगितले. त्यानंतर गावातील काही तरुणांनी धाडस दाखवले आणि घराची झडती सुरू केली. जमिनीखाली खोदकाम केले असता, एक मोठे सापाचे बिळ सापडले. यामध्ये विषारी कोब्रा सापांचा समूह राहत होता. तीन दिवस चाललेल्या रेस्क्यू मोहिमेत 60 हून अधिक कोब्रा सापांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. या सर्व सापांना जंगलात सोडण्यात आले. या घटनेनंतर विनोद यादव यांचे कुटुंब आता त्यांच्याच घरी जाण्यास घाबरत आहेत. सध्या ते नातेवाईकाच्या घरी राहत आहेत. यामुळे गावातही भीतीचे वातावरण आहे.