बिहारमध्ये याच वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष विविध प्रकारचे दावे करत आहेत. आता जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी एक मोठा दावा केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे किशोर यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी मोतिहारी येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
प्रशांत किशोर म्हणाले, 'एनडीएने चेहरा घोषित केलेला नाही. नितीश यांना एनडीएचा चेहरा घोषित करावे, अशी मागणी आम्ही करतो. एनडीएमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ते ज्यांच्या चेहऱ्याने सरकार चलवत आहेत, कारण नितीश कुमार तर सरकार चालवत नाहीत, त्यांचा केवळ चेहरा आहे. त्यामुळे, एनडीएमध्ये हिंमत असेल आणि विशेषतः भाजपमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी पुढील मुख्यमंत्री नितीश कुमार असतील हे जाहीर करावे. तेव्हाच तर त्यांना चेहरा मानले जाईल ना."
नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत -प्रशांत किशोर पुढे म्हणाले, "आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने, पंतप्रधानांनी अथवा अमित शाह यांनी नितीश कुमार हे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे म्हटलेले नाही. नोव्हेंबरनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत, हे बिहारचे राजकारण पाहणाऱ्यांना आणि समजणाऱ्यांना माहित आहे. बिहारचे निकाल काहीही असो, एनडीएला यश मिळाले तरी, अमित शहा आणि मोदीजींनी ज्याला मुख्यमंत्री बनवणार, त्यालाच एनडीएही स्वीकारणार."
"येथील आमदार त्यांची निवड करणार नाहीत. आणि एनडीएला यश मिळाले नाही, तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत. आपण आमच्याकडून एक गोष्ट लिहून घ्या, नोव्हेंबरमध्ये नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत," असेही प्रशांत किशोर म्हणाले.