- एस. पी. सिन्हापाटणा : एका बिघडलेल्या गाढवाने जबरदस्त लाथ मारून एका तगड्या म्हशीला जागेवरच ठार केल्याची विस्मयकारी घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सहिनाव गावात घडली आहे. त्याहीपेक्षा विस्मयकारी बाब म्हणजे, म्हशीच्या मालकाने आता गाढव आणि त्याच्या मालकाविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोघांविरुद्ध एफआर नोंदविण्याची मागणी केली आहे.रोहतास जिल्ह्यातील दावथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दावथ पोलीस ठाण्याचे प्रमुख अतवेंद्रकुमार यांनी सांगितले की, म्हशीच्या मालकांनी एफआयआर नोंदविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.प्राप्त माहितीनुसार, गाढवाच्या मालकाचे नाव इलियास हुसैन, तर म्हशीच्या मालकाचे नाव मुनी चौधरी असे आहे. हुसैन हे आपल्या गाढवाच्या पाठीवरून खडीची वाहतूक करीत होते. त्याचवेळी चौधरी यांची म्हैस रस्त्यात चारा खात होती. जाता-जाता गाढवाने त्या म्हशीला इतक्या जोरात लाथ मारली की, म्हैस जागेवरच गतप्राण झाली. मुनी चौधरीने तक्रारीत म्हटले आहे की, म्हशीचा चारा खाऊन होईपर्यंत खडीची वाहतूक थांबव, असे आपण इलियासला सांगितले होते. मात्र त्याने ऐकले नाही.काही गावकऱ्यांनी सांगितले की, इलियासचे गाढव हिंसक असून ते इतर जनावरांवर सातत्याने हल्ले करीत आहे. याआधी त्याने अशाच प्रकारे लत्ताप्रहार करून एक गाय ठार केली होती. आता म्हैस मारली आहे. दरम्यान, ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून झपाट्याने ‘व्हायरल’ होत आहे.
त्या गाढवानं एका लाथेत माझी म्हैस मारली, FIR घ्या साहेब! म्हशीच्या मालकाची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 08:18 IST