बिहार बोर्डाच्या दहावीच्या निकालात पित्रो गावातील एका गरीब कुटुंबातून आलेल्या रंजन वर्मा यांनी संपूर्ण बिहारमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. भोजपूर येथील अगियांव बाजार हायस्कूलचा विद्यार्थी रंजन वर्मा याने ४८९ गुणांसह बिहार बोर्डात पहिला क्रमांक पटकावला आहे. रंजनची खास गोष्ट म्हणजे त्याने आयुष्यात अनेक अडचणींना सामना करत यश मिळवलं. त्याचा जुळा भाऊ रणजीतने देखील ४७७ गुण मिळवले.
गरिबीतही मानली नाही हार
आर्थिक अडचणी असूनही रंजन आणि रणजीत यांनी त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. दोन्ही भाऊ दररोज सायकलने शाळेत जात असत. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचं फळ म्हणजे रंजनने ५०० पैकी ४८९ गुण मिळवून बिहार बोर्डात पहिला क्रमांक पटकावला, तर रणजीतने ४७७ गुण मिळवून यश मिळवलं.
वडील होते शेतकरी, दीड वर्षांपूर्वी निधन
दीड वर्षांपूर्वी जेव्हा वडिलांचं ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं तेव्हा रंजन आणि रणजीत यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. वडील कुटुंबाचा आर्थिक कणा होते आणि ते शेतकरी होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंब गंभीर आर्थिक संकटात सापडलं. रंजनची आई म्हणाली, मी खूप आनंदी आहे, आनंदाश्रू थांबत नाहीत पण फक्त एकच दुःख आहे की रंजन आणि रणजीतचे वडील आज हे पाहण्यासाठी तिथे नाहीत. मुलांचा संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटत आहे.
शेतात काम करताना करायचा अभ्यास
रंजनची आई पुढे म्हणाली, रंजन शेतात कामाला जायचा पण तरीही तो अभ्यास करत असे. शेतात भात कापणी करतानाही त्याने अभ्यास सोडला नाही. माझ्या मुलाला आयएएस व्हायचं आहे. रंजननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी अभ्यास करत असेपर्यंत आई जागी असायची. आईने गेल्या वर्षीच्या टॉपर्स आणि त्यांच्या पालकांना टीव्हीवर बोलताना ऐकलं होतं, म्हणून ती म्हणायची की जेव्हा तू टॉप करशील तेव्हा आम्हीही तुझ्याबद्दल असंच बोलू. हे सांगत असताना रंजन खूप भावुक झाला आणि त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
दोन्ही भावांना व्हायचंय आयएएस
बिहारमध्ये टॉप करणारा रंजन वर्मा आणि चांगले गुण मिळवणारा रणजीत, दोन्ही जुळे भाऊ भविष्यात आयएएस होऊ इच्छितात. भावाने संपूर्ण जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलं आहे, मला खूप आनंद आहे.' माझ्या भावाचं नाव टॉपर्स लिस्टमध्ये आलं. आम्हा दोघांनाही आयएएस व्हायचं आहे असं रणजीतने म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.