Bullet Vande Bharat Train: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन संदर्भात काही अपडेट्स येत आहेत. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधांसह अन्य कामांनी गेल्या काही वर्षांपासून चांगलाच वेग घेतला आहे. लवकरात लवकर बुलेट ट्रेन सुरू व्हावी, यासाठी भारतीय रेल्वे आणि मोदी सरकार प्रयत्नशील आहेत. यातच आता बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर वंदे भारत चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन ICF मध्येच तयार केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
२०१७ मध्ये बुलेट ट्रेल प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला होता, त्याला आता ८ वर्षे होत आहेत. जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल-२ सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आहे. ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे. २०२६ मध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान शिंकान्सेन बुलेट ट्रेन धावतील, असे अपेक्षित होते, परंतु आता ते २०३० पूर्वी शक्य नाही, असे सांगितले जात आहे.
ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू
वंदे भारत गाड्या तात्पुरत्या उपाय म्हणून बुलेट ट्रेन मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सीस्टिम लेव्हल-२ सिग्नलिंग सीस्टिम बसवली जाईल. सुविधा पडून राहण्यापेक्षा त्यांचा वापर वंदे भारत ट्रेनसाठी करता येईल. या काळात बुलेट ट्रेनसाठी लागणारी सिग्नल यंत्रणा लावता येईल, असे म्हटले जात आहे. बुलेट ट्रेन संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी नवीन माहिती देताना सांगितले की, नवीन हाय-स्पीड ट्रेन्स बुलेट ट्रेन्ससारख्याच दर्जाच्या असतील. हाय-स्पीड ट्रेनची व्याख्या ताशी २५० किमी वेगापेक्षा जास्त स्पीड घेऊ शकणारी ट्रेन अशी आहे. कारण त्या वेगाने जाण्यासाठी ट्रेनच्या रचनेत एरोडायनामिक्स बदल करावे लागतात. तसेच हाय-स्पीड ट्रेनसाठी साऊंड इन्सुलेशन महत्त्वाचे असते. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. आयसीएफ बीईएमएलसोबत काम करून ८ डब्याच्या दोन बुलेट ट्रेन तयार करेल. ही बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई कॉरिडॉरवर धावेल. आता ही ट्रेन कशी असेल, संरचना कशी असेल, याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, स्लीपर वंदे भारत ट्रेनची ताशी १८० किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आली. परंतु, सध्याचा वेग ताशी १६० किलोमीटर असेल. ही ट्रेन भारतातील इतर कोणत्याही ट्रेनच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने धावेल. प्रवाशांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून ट्रेनमधील वैशिष्ट्ये अत्याधुनिक ठेवण्यात आली आहेत. या ट्रेनमध्ये १६ डबे असतील आणि स्लीपर वंदे भारत कोणत्या मार्गांवर सुरू करायच्या हे रेल्वे बोर्ड ठरवेल. तसेच आम्हाला ५० अमृत भारत ट्रेन तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी २५ आयसीएफ आणि उर्वरित २५ कपूरथळा कारखान्यात तयार केल्या जातील. अमृत भारत ट्रेन २२ कोचच्या असतील, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.