पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडे एम ४ असॉल्ट रायफल आणि एके ४७ रायफली होत्या. जवळपास २० ते २५ मिनिटे त्यांनी हैदोस घातला होता. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. तिथे जवळपास २००० लोक होते, एकत्र नव्हते हीच एक जमेची बाजू होती. एकत्र जमलेले असते तर आणखी मृत्यू झाले असते. या हल्ल्यावेळी नौदलाचा एक अधिकारी देखील शहीद झाला आहे. परंतू तिथे भारतीय लष्कराचा एक मोठा अधिकारी देखील होता असे समोर आले आहे.
गोळीबार सुरु होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते. त्यांच्या पुढील धोका लक्षात आला. गेटवर जर दहशतवादी घात लावून बसले असतील तर मोठ्या संख्येने बळी जातील, याची त्यांना कल्पना आली. त्यांनी सर्व बाजुंनी गेटकडे धावणाऱ्या लोकांना आवाज दिला, गेटकडे धावू नका आणि थांबविले व इतर मार्गांनी बाहेर जाण्यास सांगितले.
कर्नाटकातील सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रसन्न कुमार भट यांनी ही घटना एक्सवर पोस्ट केली आहे. हा लष्करी अधिकारी त्यांचा भाऊ आहे. प्रसन्न कुमार भट्ट हे देखील त्यांच्या पत्नी, लष्करी अधिकारी भाऊ आणि मेहुण्यांसह पहलगामच्या बैसरन खोऱ्यात फिरायला आले होते. तिथे गेल्यानंतर २० मिनिटांनी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. इतर मुले खेळत होती, त्यांच्या लक्षात आले नाही. परंतू, मोठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गेटकडे धाव घेतली. भट्ट यांनी गेटपासून ४०० मीटर लांब असलेल्या एका मोबाईल टॉयलेटमागे कुटुंबाला लपविले.
दहशतवादी हल्ला झाल्याचे लष्करी अधिकाऱ्याच्या लक्षात आहे, तो एके ४७ मधून गोळ्या सुटल्याचा आवाज होता. अधिकाऱ्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, त्यांनी लोकांना धावताना पाहून लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि झुंडीने जाण्याऐवजी विखुरलेल्या स्थितीत उलट्या दिशेला जाण्यास सांगितले. तसेच दुसऱ्या वाटांचा शोध घेतला. एका नाल्याच्या बाजुने कुंपण नसल्याचे दिसले, या लोकांना त्यांनी त्या दिशेने जाण्यास सांगितले आणि बाहेर काढले. माती ठिसूळ असल्याने लोक पळू शकले नाहीत, परंतू घसरत त्यांनी कुंपण पार केले. याच लष्करी अधिकाऱ्याने सैन्याच्या तुकडीला आणि श्रीनगर आर्मी हेडक्वार्टरला दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली.
दुपारी ३ वाजेपर्यंत बंदुकांचे आवाज येत होते. यानंतर जवळपास ४० मिनिटांनी हेलिकॉप्टरचे आवाज येऊ लागले. चार वाजता सैन्याची एक तुकडी कुटुंबासोबत लपलेल्या लष्करी अधिकाऱ्याकडे पोहोचली. तसेच घाबरलेल्या लोकांना विश्वास देण्यास सुरुवात करण्यात आली.