बंडखोरांविरुद्ध भूतानची मदत घेणार?
By Admin | Updated: December 26, 2014 05:25 IST2014-12-26T05:25:44+5:302014-12-26T05:25:44+5:30
आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँडच्या (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर

बंडखोरांविरुद्ध भूतानची मदत घेणार?
गुवाहाटी/सोनितपूर : आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँडच्या (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे़ उल्फाविरोधी मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क साधण्याचाही सरकारचा विचार आहे़
एनडीएफबी-एस बंडखोरांनी आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर या हिंसाचारातील बळींची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे़
कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त सोनितपूरचा दौरा केल़ा़ बोडो बंडखोरांचा हिंसाचार सरकार कदापी सहन करणार नाही़ एनडीएफबी (एस) विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ एनडीएफबी (एस) विरुद्ध निश्चितपणे मोहीम छेडली जाईल; मात्र कधी, हे तूर्तास सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़
परराष्ट्रमंत्र्यांना आवाहन
डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांवर अंकुश आणण्यासाठी भूतानची मदत घेण्याचा विचार सरकारने चालवला आहे़ या प्रकरणी तात्काळ भूतानच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे विनंतीवजा आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केल्याचे कळते़
एनडीएफबीने भारत-भूतान सीमेवरील घनदाट जंगलात आपली काही ठिकाणे तयार केल्याचे मानले जाते़ भारतीय सुरक्षा दलांनी मोहीम उघडताच, एनडीएफबी बंडखोर पळून भूतान भागात दडून बसतात़ यामुळे त्यांच्यासोबत लढा देणे कठीण होते़
सन २००३-०४ मध्ये भूतानने उल्फाविरुद्ध मोहीम चालवून त्यांना आपल्या देशातून हाकलले होते व त्यांची सारी ठिकाणे नष्ट केली होती़ (वृत्तसंस्था)