दिल्लीत 'आप'च्या पराभवासाठी भूषण व यादव करत होते प्रयत्न
By Admin | Updated: March 10, 2015 12:06 IST2015-03-10T11:11:31+5:302015-03-10T12:06:27+5:30
शांती भूषण व प्रशांत भूषण हे पिता-पुत्र आणि व योगेंद्र यादव हे तिघे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न करत होते असा आरोप 'आप'च्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे.

दिल्लीत 'आप'च्या पराभवासाठी भूषण व यादव करत होते प्रयत्न
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात सुरू असलेला संघर्ष आज अधिक उफाळून आला आहे. शांती भूषण व प्रशांत भूषण हे पिता-पुत्र आणि व योगेंद्र यादव हे तिघे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न करत होते असा आरोप 'आप'च्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे. मनिष सिसोदिया, गोपाळ राय, संजय सिंह व पंकज गुप्ता यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शांती भूषण, प्रशांत भूषण व योगेंद्र यादवना लक्ष्य करण्यात आले असून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'दिल्ली निवडणुकीत आपला यश मिळावे यासाठी पक्षाचे कार्यकर्ते झटत असतानाच प्रशांत भूषण, शांती भूषण व योगेंद्र यादव हे पक्षाचा पराभव व्हावा असा प्रयत्न करत होते', असे त्यात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या इतर राज्यांतील नेत्यांनी फोन करून दिल्लीत प्रचारासाठी येऊ नये असे सांगितले. तसेच पक्षाला देणगी देण्यापासूनही लोकांना रोखण्यात आले. तर योगेंद्र यादव हे राष्ट्रीय वृत्तपत्रांना केजरीवाल यांच्या विरोधात बातम्या पुरवत होते, असे आरोप पत्रकात करण्यात आले आहेत.