मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील समरीन सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण तिची दोन लहान मुलं (सव्वा वर्षांची मुलगी जुनेरा आणि ६ वर्षांचा मुलगा शाझिल) पाकिस्तानी आहेत आणि समरीनचा पाकिस्तानी व्हिसाचा कालावधी संपला आहे.
समरीनचं लग्न ७ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील सद्दामशी झालं होतं. तिच्या आईचे अनेक नातेवाईक कराची आणि इतर ठिकाणी राहतात, त्यामुळे तिचं लग्न पाकिस्तानात ठरलं. समरीन तिच्या दोन्ही मुलांसोबत पहिल्यांदाच भारतात आली होती जेणेकरून ते त्यांच्या आजीला भेटू शकतील. ती जवळपास दोन महिने भारतात आहे. तिचा पासपोर्ट डिसेंबर २०२५ मध्ये संपणार होता, तो रिन्यू करण्याच्या आणि पाकिस्तानी व्हिसाचं एक्सटेन्शन करण्याच्या प्रोसेसमध्ये होती. पण पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थितीच बदलली.
दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
"इतकी लहान मुलं त्यांच्या आईपासून कशी दूर राहतील?"
'आज तक'शी बोलताना समरीन म्हणाली, "मी सहा वर्षांनी भारतात परतली आहे. मी माझ्या मुलांना पहिल्यांदाच त्यांच्या आजीला भेटण्यासाठी सोबत आणलं होतं. पण परिस्थिती इतकी बिकट होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. आता असं म्हटलं जात आहे की, मुलांना परत जावं लागेल. हे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. माझी तब्येत ठीक नाही आणि मुलंही आजारी आहेत. त्यांना एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य आहे. इतकी लहान मुलं त्यांच्या आईपासून कशी दूर राहतील?"
हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
"माझे पती दुबईमध्ये आहेत”
पाकिस्तानी व्हिसाची मुदत संपली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत नवीन व्हिसा मिळणं कठीण वाटत आहे. पाकिस्तानमध्ये आमच्या घरी कोणी नाही, फक्त माझी आजारी आणि वृद्ध सासू आहे. माझे पती दुबईमध्ये आहेत. त्यामुळे तिथे मुलांची काळजी कोण घेईल? मी मुलांच्या व्हिसा एक्सटेंशनसाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला आहे. मी मानवतेच्या आधारावर माझ्या मुलांचा व्हिसा वाढवण्याची सरकारला विनंती करते."
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
“पहलगाममध्ये घडलेली घटना निंदनीय, दोषींना शिक्षा झाली पाहिजे”
समरीनने असंही म्हटलं आहे की, तिने पाकिस्तानी नागरिकत्व घेतलं नाही कारण त्यामुळे भारतात परतणं कठीण झालं असतं. ती तिथे व्हिसा एक्सटेंशनवर राहत होती. आता भारतात परतण्यासाठी तिने एक्झिट परमिट आणि एक्सटेंशन घेतलं होतं, पण परत जाण्यासाठी नवीन व्हिसा आवश्यक आहे, जो आता मिळणं कठीण झालं आहे. "माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, माझी मुलं माझ्यापासून वेगळी होऊ नयेत. पहलगाममध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. पण यासाठी सामान्य लोकांना का शिक्षा दिली जात आहे?" असा सवालही समरीनने केला आहे.