'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सशस्त्र दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत या मिशनची संपूर्ण माहिती दिली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, "आमच्या गुप्तचर यंत्रणेने भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. या कारवायांना वेळीच रोखणं आणि त्यांचा प्रतिकार करणं अतिशय आवश्यक आहे. आज सकाळी भारताने अशा सीमापार हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा आणि रोखण्याचा आपला अधिकार वापरला आहे. ही कृती अत्यंत विचारपूर्वक, कुणालाही चिथावणी न देणारी, प्रमाणबद्ध आणि जबाबदार आहे. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर आणि भारताच्या मार्गावर असलेल्या संभाव्य आतंकवाद्यांना निष्क्रिय करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे."
व्योमिका सिंह यांचा इशारा
दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटले की, "आम्ही पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड देण्यास तयार आहोत. जर, भविष्यात पाकिस्तानने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली, तर भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे."
कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, "७ मे २०२५ रोजी रात्री १.०५ ते १.३० दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सुरू करण्यात आले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ती तळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. त्यांना आता थांबवणे आवश्यक आहे."