नवी दिल्ली : गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (आय४सी) शनिवारी देशभरातील धार्मिक यात्रेकरू आणि पर्यटकांना लक्ष्य करून होणाऱ्या ऑनलाइन बुकिंग फसवणुकीबाबत सार्वजनिक अलर्ट जारी केला आहे.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा व पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची सत्यता पडताळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच फक्त अधिकृत सरकारी पोर्टल किंवा विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सींद्वारेच बुकिंगची करण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
बनावट वेबसाइट्स, फसवे सोशल मीडिया पेजेस, फेसबुक पोस्ट आणि गुगलसारख्या सर्च इंजिनवर सशुल्क जाहिरातींद्वारे ही फसवणूक केली जात आहे. नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बनावट वेबसाइट्स बंद केले जात आहेत.
कुणाची होते फसवणूक?
केदारनाथ आणि चार धामसाठी हेलिकॉप्टर बुकिंग, यात्रेकरूंसाठी हॉटेल आरक्षण, ऑनलाइन टॅक्सी सेवा आणि धार्मिक टुर पॅकेजेस अशा ऑफर देऊन पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.
कोणत्याही पर्यटकांनी फसवणुकीच्या बाबतीत तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर www.cybercrime.gov.in वर किंवा १९३० वर कॉल करा आणि तक्रार करा.
या गोष्टी लक्षात ठेवा...
केदारनाथ हेलिकॉप्टर बुकिंग https://www. heliyatra.irctc.co.in द्वारे करता येते. सोमनाथ ट्रस्टची अधिकृत वेबसाइट https://somnath.org आहे आणि गेस्ट हाऊस बुकिंग त्याचद्वारे करता येते.