बीफ पार्टी देणा-या आमदाराला भाजपा आमदारांची सभागृहातच मारहाण
By Admin | Updated: October 8, 2015 11:36 IST2015-10-08T11:33:17+5:302015-10-08T11:36:07+5:30
बीफ पार्टी आयोजित केली म्हणून भाजपा आमदारांनी अपक्ष आमदार रशीद यांना सभागृहातच मारहाण केल्याची घटना आज सकाळी श्रीनगरमध्ये घडली.

बीफ पार्टी देणा-या आमदाराला भाजपा आमदारांची सभागृहातच मारहाण
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ८- गोमांसाच्या मुद्यावरून संपूर्ण देशातील वातावरण तापलेले असतानाच बीफ पार्टी आयोजित केली म्हणून भाजपा आमदारांनी अपक्ष आमदार रशीद यांना सभागृहातच मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली.
जम्मू- काश्मीरमधील लंगते मतदारसंघातील आमदार शेख अब्दुल रशीद यांनी बुधवारी आमदार निवासस्थानाच्या परिसरात बीफ पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर रशीद यांनी आज सकाळी सभागृहात प्रवेश केल्यावर भाजपा आमदरांनी त्यांना सभागृहातच घेराव घातला आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी रशीद यांची कशीबशी सुटका केली. मुफ्ती मोहम्मद सईद व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
दरम्यान या आठवड्यातच गोमांस बंदीच्या विषयावरून काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सने सभागृहामध्ये निदर्शने केली होती, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले होते. गोमांस विक्रीवर राज्यात कायदेशीर बंदी आणण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे.