बीफ बॅन हत्याप्रकरण - राजकीय पक्ष आपली पोळी भाजत असल्याचा केजरीवालांचा आरोप
By Admin | Updated: October 3, 2015 15:07 IST2015-10-03T15:06:18+5:302015-10-03T15:07:05+5:30
एका मुस्लीमाला बीफ बाळगल्याच्या अफवेवरून जीवे मारण्याची घटना घडली ती माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त

बीफ बॅन हत्याप्रकरण - राजकीय पक्ष आपली पोळी भाजत असल्याचा केजरीवालांचा आरोप
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - उत्तर प्रदेशातल्या दादरी जिल्ह्यातल्या बिसखेडामध्ये एका मुस्लीमाला बीफ बाळगल्याच्या अफवेवरून जीवे मारण्याची घटना घडली ती माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. या घटनेचा राजकीय पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी भाजपा अथवा सपाचा उल्लेख न करता केला आहे.
मोहम्मद अखलाख यांचा या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यांनी घरात गोमांस बाळगल्याची अफवा पसरली आणि काही गुंडांनी त्यांच्या घरावर हल्ला करत त्यांना व त्यांच्या मुलाला मारझोड केली, ज्यात अखलाख यांचा अंत झाला.
विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अखलाख यांच्या भेटीच्या वेळी तसेच प्रसारमाध्यमांसमोर मते व्यक्त करत या घटनेला देशव्यापी आयाम मिळवून दिला. ज्या गावात हा प्रकार घडला त्या गावातील लोक मात्र या सगळ्या प्रकाराल इतके त्रस्त झाले आहेत की आज त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येण्यास अटकाव केला तसेच गावातील लोकांशी बोलून परिस्थिती बिघडवू नका असे सुनावले.
त्याचवेळी केजरीवाल आले असता, परिस्थिती ठीक नसल्याचे सांगत पोलीसांनी जवळपास दोन तास केजरीवालांना गावाबाहेर थांबवून ठेवले.
नंतर केजरीवाल यांनी गावक-यांची व अखलाख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
या घटनेचा ना हिंदूंना लाभ झाला ना मुस्लीमांना, मात्र, मधल्यामध्ये राजकीय पक्ष मात्र आपली पोळी भाजत असल्याची टिप्पणी केजरीवालांनी नंतर केली आहे.