हिमवृष्टीने गुलमर्गचे सौंदर्य खुलले
By Admin | Updated: February 3, 2015 02:10 IST2015-02-03T02:10:55+5:302015-02-03T02:10:55+5:30
काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध गुलमर्ग स्काय रिसोर्टवर पर्यटकांनी गर्दी केली असून लागोपाठ दुसऱ्या दिवशी अधूनमधून होणाऱ्या हिमवृष्टीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.

हिमवृष्टीने गुलमर्गचे सौंदर्य खुलले
पर्यटक आनंदित : स्काय रिसोर्टवर गर्दी; बर्फाचा दीड फुटाहून मोठा थर, व्यवसायात वाढ
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध गुलमर्ग स्काय रिसोर्टवर पर्यटकांनी गर्दी केली असून लागोपाठ दुसऱ्या दिवशी अधूनमधून होणाऱ्या हिमवृष्टीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. पर्यटकांच्या आगमनासोबतच व्यवसायाने जोर धरल्यामुळे स्थानिक रहिवाशीही खुश झाले आहेत. गुलमर्ग भागात गेल्या दोन दिवसांत दीड फुटापेक्षा जास्त बर्फ जमा झाला आहे. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४५.७ सें.मी. बर्फ पडल्याचे हवामान विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
गुलमर्गची हिमवृष्टी विदेशी पर्यटकांसाठी विशेषत: स्कायर्ससाठी खास आकर्षण ठरते. गेल्या दोन दिवसांत या रिसोर्टवरील तापमान किंचित वाढले असून उणे ६ अंशावरून उणे ४.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. दक्षिण काश्मिरातील पहलगाम हा अमरनाथ यात्रेकरूंचा तळ मानला जातो.
या ठिकाणचे तापमान उणे ३.४ अंश सेल्सियसवरून उणे ०.६ पर्यंत वाढले आहे. रविवारी रात्री पहलगामला ८.६ सें.मी. बर्फ पडला. दक्षिण काश्मिरातील कोकेर्नाग हिल रिसोर्टवर २ सें.मी. बर्फवृष्टीची नोंद झाली. (वृत्तसंस्था)
कारगिल सर्वाधिक थंड, २४ तासांत जोरदार हिमवृष्टीचा इशारा
लडाखमधील कारगिल भागात शनिवारची रात्र सर्वाधिक थंड ठरली. तेथे उणे १४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. त्या तुलनेत रविवारी रात्री थोडे जास्त उणे ११.४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. हवामान विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये येत्या २४ तासांत जोरदार हिमवृष्टी किंवा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला सतर्क केले आहे.