सावधान!! फेसबुकवर 'I Love You' टाकल्यास होणार शुभमंगल
By Admin | Updated: February 5, 2015 14:14 IST2015-02-05T12:33:05+5:302015-02-05T14:14:20+5:30
यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणा-यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.

सावधान!! फेसबुकवर 'I Love You' टाकल्यास होणार शुभमंगल
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ५ - फेसबुक, ट्विटर, वॉट्स अॅप यासारख्या सोशल मिडीयाद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा तुमचा इरादा असेल तर सावधान. यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणा-यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे. सोशल मिडीयावर प्रियकर अथवा प्रेयसीला उद्देशून आय लव्ह यू असे टाकल्यास हिंदू महासभेचे कार्यकर्ते त्या प्रेमी युगूलाचे लग्न लावून देणार आहेत.
हिंदू महासभेने व्हॅलेंटाईन डेला आंतरधर्मीय विवाह लावणार असल्याचे जाहिर केले होते. यामाध्यमातून घरवापसीचा कार्यक्रम राबवण्याचा हिंदू महासभेचा प्रयत्न होता. आता त्या पाठोपाठ हिंदू महासभेने व्हॅलेंटाईन डेविरोधात आणखी एका नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. व्हॅलेंटाइन डेला सोशल मिडीयावर नजर ठेवण्यासाठी हिंदू महासभेने आठ पथकं तयार केली असून ही पथक सोशल मिडीयावर साथीदाराला उद्देशून आय लव्ह यू असा संदेश टाकणा-या तरुणाईवर नजर ठेवणार असल्याचे हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. ८ फेब्रुवारीपासून ही पथकं कार्यरत होणार आहे. दिल्ली निवडणूक संपताच आमची पथकं तरुणाईवर नजर ठेवेल. सुरुवातीला आम्ही त्यांना खरं प्रेम काय असते हे समजवून पाश्चिमात्त्य संस्कृतीचे अनुकरण करु नका हे सांगू. यावर त्या प्रेमी युगूलाने प्रतिसाद दिला नाही तर त्यांना मेल पाठवून त्यांचा मोबाईल नंबर व घराचा पत्ता मागितला जाईल आणि त्यांच्याशी संपर्क साधू. तसेच त्यांच्या पालकांना सांगून त्यांचे लग्नही लावू दिले जाईल असे कौशिक यांनी सांगितले. एखादे युगूल खरंच प्रेम करत असेल तर त्यांचे लग्न लावून देण्यात गैर काय असा उलट सवालही कौशिक यांनी उपस्थित केला. सोशल मिडीयासोबतच मॉल, बगिचा अशा सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या प्रेमी युगूलांनाही शिक्षा केली जाईल असा इशाराही हिंदू महासभेने दिला आहे. हिंदू महासभेच्या या उपक्रमाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.