बराक ओबामा यांना ‘महाराजा’चे आवतन; रेल्वेने आग्रा भेटीचा प्रस्ताव
By Admin | Updated: January 20, 2015 01:29 IST2015-01-20T01:29:57+5:302015-01-20T01:29:57+5:30
भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिशान ‘महाराजा एक्स्प्रेस’ने प्रवास करून भारतीय रेल्वेच्या राजेशाही आदरातिथ्याचा आस्वाद घ्यावा,

बराक ओबामा यांना ‘महाराजा’चे आवतन; रेल्वेने आग्रा भेटीचा प्रस्ताव
नवी दिल्ली : पुढील आठवड्यात भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिशान ‘महाराजा एक्स्प्रेस’ने प्रवास करून भारतीय रेल्वेच्या राजेशाही आदरातिथ्याचा आस्वाद घ्यावा, असे औपचारिक निमंत्रण ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (आयआरसीटीसी) दिले आहे.
‘आयआरसीटीसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. के. मनोचा यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून रूकार घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयामार्फत यासाठी ओबामा यांना औपचारिक निमंत्रण पाठविण्यात आले आहे. हे निमंत्रण स्वीकारले गेले तर ओबामा आणि त्यांचे कुटुंबीय ‘महाराजा एक्स्प्रेस’च्या एका रात्रीचे तीन हजार अमेरिकन डॉलर एवढे भाडे असलेल्या ‘प्रेसिडेन्शियल स्यूट’मधून प्रवास करतील.
मनोचा म्हणाले की, ओबामा २७ जानेवारीस दिल्लीहून आग्रा येथे जातील अशी अपेक्षा आहे व त्यांनी ही सफर आमच्या ‘महाराजा एक्स्प्रेस’ मधून राजेशाही थाटाने करणे आदर्श ठरेल, असे आम्हाला वाटते. तेवढा वेळ नसेल तर त्यांनी निदान या रेल्वेगाडीतून दिल्लीभोवती छोटासा फेरफटका मारावा किंवा निदान या गाडीत शाही मेजवानीचा तरी आस्वाद घ्यावा, अशी आमची विनंती आहे.
ते म्हणाले की, ‘महाराजा एक्स्प्रेस’ दिल्ली ते आग्रा हे अंतर सर्वसाधारणपणे अडीच तासांत कापते. पण शेवटी हे अतिथीवर अवलंबून आहे. त्यांना जर निवांतपणे प्रवास करायचा असेल तर त्यानुसार गाडीचा वेग ठरविता येईल. आम्हाला फक्त दोन दिवस आधी कळविले तरी आमची जय्यत तयारी आहे. ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी फक्त हो म्हणायचा अवकाश. त्यांची ही सफर चिरस्मरणीय करण्याची जबाबदारी आमची, असा विश्वासही मनोचा यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्दोन दिवसांच्या भारत भेटीत दिल्लीतील सरकारी कार्यक्रमांखेरीज ओबामा जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जातील, असे जवळजवळ नक्की होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या प्रथम कुटुंबाने दिल्ली ते आग्रा हा प्रवास खास विदेशी पर्यटकांना राजेशाही रेल्वे सफरीचा अनुभव देण्यासाठी तयार केलेल्या आलिशान अशा ‘महाराजा एक्स्प्रेस’ने करावा, अशी रेल्वेची अपेक्षा आहे.
च्आम्ही आठवड्यापूर्वीच निमंत्रण दिले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अद्याप कळविले गेले नसले तरी आमचे निमंत्रण स्वीकारले जाईल, अशी आम्हाला आशा आहे. निमंत्रण अद्याप नाकारलेही गेलेले नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.