उत्तर प्रदेशमध्ये श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड भागात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात विद्युत प्रवाह पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी सोमवार असल्याने अवसानेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. जलाभिषेकादरम्यान काही माकडांनी मंदिरात असलेल्या टिन शेडवर उड्या मारल्या. त्यामुळे तार तुटली आणि शेडवर पडली. तार पडताच त्यातून विद्युत प्रवाह शेडमध्ये पसरला, ज्यामुळे तेथे उपस्थित लोक घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली.
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
बाराबंकीचे डीएम शशांक त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अवसानेश्वर महादेव मंदिरात मोठी दुर्घटना झाली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर ४० जण जखमी झाले. मंदिरातील टिन शेडवर माकडांनी उड्या मारल्याने तार तुटली. त्यामुळे विद्युत प्रवाह पसरला आणि लोक धावू लागले. अचानक परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरी झाली.
मृतांमध्ये लोणीकात्रा पोलीस स्टेशन परिसरातील मुबारकपुरा गावातील २२ वर्षीय रहिवासी प्रशांत आणि आणखी एका भाविकाचा समावेश आहे. दोघांनाही उपचारासाठी त्रिवेदीगंज सीएचसी येथे आणण्यात आलं होतं मात्र त्यांचा मृत्यू झाला. रविवारी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले.