थकबाकीमुळे बँका होणार अस्थिर
By Admin | Updated: May 10, 2017 00:45 IST2017-05-10T00:45:33+5:302017-05-10T00:45:33+5:30
उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ

थकबाकीमुळे बँका होणार अस्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ आणि गृह क्षेत्रातील कर्ज हेच बँकांसाठी मिळकतीचे उत्त्तम साधन ठरणार आहे. गुंतवणूक बँकिंग संस्था जेफरीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.
भारतीय बँकांचे उद्योग क्षेत्रातील बुडीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) अलिकडे प्रचंड वाढले आहे. त्याविरुद्ध केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी काही उपाय योजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या एका अहवालात जेफरीजने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, एनपीएच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार काही कायदेशीर चौकट निश्चित करील, असे दिसते. अडथळे दूर करण्यासाठी नवीन कायदेही केले जाऊ शकतात. अशी पावले उचलणे चांगले असले तरी त्यासाठी नेहमीच खूप वेळ लागत आला आहे. अहवाल म्हणतो की, उद्योग क्षेत्रातील कर्जाची स्थिती लगेच सुधारणार नाही. उद्योग क्षेत्राला कर्ज देणाऱ्या बँकांची मिळकत अस्थीर आणि कमजोरच राहील. अशा परिस्थितीत बँकांसाठी शुद्ध किरकोळ कर्ज आणि गृहकर्ज हे व्यवसायाचे चांगले पर्याय ठरतात.
१२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार-
५ मे रोजी सरकारने एक आदेश काढून बँकिंग नियमन कायद्यात दोन नवी कलमे घातली आहेत. यापैकी एक असलेल्या ३५एए या कलमान्वये थकबाकीदार उद्योगांवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे. याचवेळी दिवाळखोरी कायद्याच्या चौकटीबाहेर समेटासाठी संयुक्त ऋणदाता मंच (जेएलएफ) विषयक नियम रिझर्व्ह बँकेने शिथील केले आहेत. त्यामुळे येत्या १२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार आहे, असे जेफरीजने म्हटले आहे.